काँग्रेसच्या चुका

सोमवार, 8 जून 2026 रोजी दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काही निर्णय एकमताने घेण्यात आले असले, तरी समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या पक्षांनी काँग्रेसच्या चुकांवर अचूक बोट ठेवले. तामिळनाडूत केवळ दोन मंत्रिपदांसाठी काँग्रेसने द्रविड मुनैत्र कळघम (द्रमुक) या पक्षाला आघाडीतून बाहेर पडण्यास भाग पाडले, हीच बाब काही पक्षांनी निदर्शनास आणून दिली. केरळ विधानसभा निवडणूक प्रचारात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांनी माकपवर भाजपसोबत तडजोड केल्याचा आरोप केला होता. डावे आता डावे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली होती. मुळात माकपची भाजपसोबत तडजोड कशी होऊ शकेल, हा प्रश्न आहे. बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसला आरसा दाखवला. मित्रपक्षांना काँग्रेसकडून नीट वागणूक मिळत नाही किंवा काँग्रेस पक्ष आपले हित साधण्याचाच नेहमी प्रयत्न करत आला आहे. मित्रपक्षांची सत्ता असलेल्या राज्यांत निवडणुकीत जादा जागांची मागणी करणे, आपली ताकद असलेल्या राज्यांत मित्रपक्षांना कमी लेखणे, ऐनवेळी आघाडीबाहेरच्या पक्षाशी जुळवून घेणे इत्यादी प्रयोग काँग्रेसने केले आहेत. याचमुळे आघाडीच्या बैठकीत मित्रपक्षांनी काँग्रेसला आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, ओमर अब्दुल्ला, जॉन ब्रिटास, डी. राजा आदींनी काँग्रेसच्या चुकांवर बोट ठेवले. बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले असले, तरी सहभागी झालेल्या काही पक्षांनी काँग्रेसलाच जाब विचारला. एखाद्या राज्यात सत्ता मिळावी किंवा सत्तेत वाटा मिळावा म्हणून काँग्रेसने आघाडीचा धर्मच गुंडाळून ठेवल्याची बाब घटक पक्षांच्या नेत्यांनी निदर्शनास आणून दिली. द्रमुकला आघाडीत परत आणण्याची जबाबदारी काँग्रेसनेच घ्यावी, असे काही नेत्यांनी सुचवले. बैठकीत काँग्रेसवर टीका झाल्यानंतर पाच निर्णय एकमताने झाल्याचे जाहीर करून आघाडी संघटित असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्नही केला गेला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघमला बहुमतासाठी जागा कमी पडत असल्याचे पाहून काँग्रेसने सर्वप्रथम पाठिंबा दिला. नंतर काँग्रेसने सत्तेत सहभागही घेतला आणि दोन मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. याचवरून द्रमुकने उघड नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने आपला विश्वासघात केला, असे म्हणत द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभाग न घेण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हाच काँग्रेसच्या भूमिकेवर घटक पक्षांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी केरळचा मुद्दा उपस्थित केला. भाजपविरुद्ध विरोधी पक्षांची मोठी संघटित आघाडी उभी करायची असेल, तर सर्वांतील मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने दिलदारपणा दाखवावा, असे या बैठकीत काही पक्षांनी सूचित केले. तामिळनाडूतील सर्वांत मोठा आणि एक महत्त्वाचा पक्ष द्रविड मुनैत्र कळघम इंडिया आघाडीतून बाहेर का पडला, असा थेट सवाल काँग्रेसला करण्यात आला. या पक्षाला इंडिया आघाडीत काँग्रेसनेच परत आणावे, असे काही घटक नेत्यांनी बजावले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी द्रमुकचाच मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला. प्रादेशिक पक्षांशी प्रभावी समन्वय साधण्यात काँग्रेस कमी पडत असल्याचे त्यांनी थेटपणे स्पष्ट केले. आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष या नात्याने काँग्रेसने सहकारी प्रादेशिक पक्षांप्रति उदारता दाखवली पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. जेथे प्रादेशिक पक्ष सशक्त आहेत, तेथे काँग्रेसने त्यांच्याशी स्पर्धा न करता त्यांना पाठिंबा द्यावा, हा एक समझोता होता, याची आठवण अखिलेश यांनी करून दिली. आम आदमी पार्टी आणि डाव्या पक्षांवर विविध राज्यांत काँग्रेसकडून होणार्‍या हल्ल्यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत अखिलेश यादव यांनी आघाडीच्या एकसंधतेवर भर दिला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसने एकच भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले. देशापुढील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे आघाडी दुर्लक्ष करत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील मतदार याद्यांमधून अल्पसंख्याक मतदारांची मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात असल्याचेही यादव यांनी यावर अधोरेखित केले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही काँग्रेसच्या भूमिकेवर कडक टीका केली. बिहारमध्ये काँग्रेसमधील कलह आघाडीला मारक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसच्या आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे विरोधी आघाडीला राज्यसभेची एक जागा गमवावी लागली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. समन्वयाच्या अभावामुळे आणि अंतर्गत वादांमुळे विरोधकांना किमान 13 ते 14 विधानसभा जागा गमवाव्या लागल्या, हेही त्यांनी स्पष्ट केले. द्रमुकला परत आघाडीत आणण्याची आग्रही भूमिका त्यांनी अखिलेश यांच्याप्रमाणेच मांडली. नितीश कुमार यांचा जनता दल पक्ष सोबत राहिला असता, तर आघाडी अधिक मजबूत स्थितीत असती, असेही ते म्हणाले. अखिलेश आणि तेजस्वी यांनी काँग्रेसच्या डोळ्यांत अंजन घातले असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही द्रमुकला आघाडीत परत आणण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही आघाडीतील सहकारी पक्षांमध्ये चांगला समन्वय असण्याची गरज अधोरेखित केली आणि द्रमुकला पुन्हा विरोधी आघाडीत आणण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला. माकपचे राज्यसभेतील नेते जॉन ब्रिटास यांनी ’भाजपसोबत तडजोड’ हा मुद्दा उपस्थित केला. ब्रिटास यांनी राहुल गांधी यांना यावरून थेट सुनावले. आमची भाजपसोबत तडजोड असल्याचा आरोप प्रमुख नेत्यांनी करणे म्हणजे गंभीर गोष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या पक्षाच्या आणि डाव्या आघाडीच्या योगदानाची आठवण करून दिली. सन 2004 मध्ये माकपने काँग्रेसचा अनेक मतदारसंघांत पराभव केला असतानाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 64 जागा देऊन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार स्थापनेला पाठिंबा दिला होता, हेच त्यांनी निदर्शनास आणून दिले. भाजपविरोधी लढाईत आम्ही कधीही तडजोड केली नाही, असे ब्रिटास यांनी ठामपणे सांगितले. तुम्हाला आमचे नेते पिनराई विजयन यांना अटक व्हावी असे वाटत होते, नॅशनल हेराल्ड प्रकरणात आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्ही मोठे चित्र पाहिले नाही आणि दोन मंत्रिपदांसाठी सहकारी द्रमुकला वार्‍यावर सोडले, असे ब्रिटास यांनी सुनावले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी ब्रिटास यांच्या युक्तिवादाला पाठिंबा दिला. बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. त्यांचे काँग्रेसशी आधीपासूनच सख्य नाही. झारखंडचे मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांनी बैठकीला आभासी पद्धतीने उपस्थिती नोंदवली. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनीही तसेच केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला देशातील 25 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. आघाडी एकसंध असल्याचे दाखवून देण्यात आले. राहुल गांधी यांनी सारवासारव केली. काँग्रेस सहकारी पक्षांची टीका स्वीकारण्यास तयार असून, आघाडीत अधिक भक्कम समन्वयाची आवश्यकता असल्याचे राहुल यांनी मान्य केले. सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधी लढाईत एकसंध राहणे, हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे आणि देशाच्या व्यापक हितासाठी एकत्र काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यांनी सारवासारव केली, तरी यापुढे मित्रपक्षांबाबत काँग्रेस नेत्यांना जबाबदारीने बोलावे लागेल.

Congress’s mistakes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *