पाच जणांवर गुन्हा दाखल; आयशर ट्रक ताब्यात
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी महामार्गावरील बोरटेंभे शिवारात अन्न व औषध प्रशासनाने सापळा रचून बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा आयशर ट्रक जप्त केला. या कारवाईत 79 लाख 27 हजार 192 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध सुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक (नाशिक विभाग) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने जनआरोग्याच्या दृष्टीने बंदी घातलेला प्रिमियम राज निवास सुगंधित पानमसाला आणि प्रिमियम झेड-एन-01 जाफरानी जर्दा (सुगंधित तंबाखू) या मालाची आयशर ट्रक (डीडी 01 झेड 9360) द्वारे भिवंडी येथे विक्रीसाठी अवैध वाहतूक केली जात होती. याप्रकरणी खालील चार जणांवर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दिनेश पूनमचंद शर्मा (वय 47, वाहन चालक, रा. इंदूर, मध्य प्रदेश),जालीम सिंग (रा. सेंट्रल पॉईंट, इंदूर, मध्य प्रदेश) यांच्यावर 3 जुलै 2026 रोजीही इगतपुरी पोलीस ठाण्यात असाच गुन्हा दाखल आहे.
भिवंडी येथील अज्ञात खरेदीदार असून, वाहनाचा मालकही अज्ञात आहे. अन्न सुरक्षा अधिकार्यांनी पंचनामा करून 21 लाख 60 हजार रुपयांचा पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि वाहतूक करणारा आयशर ट्रक असा एकूण 79.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल गायधनी, गोपनीय शाखेचे निलेश देवराज, विलास धारणकर, पी. व्ही. घेगडमल, विजय रुद्रे, कृष्णा गोडसे, पटेकर व मेमाने यांच्या पथकाने केली.
Contraband worth ₹79 lakh, including gutkha, seized.