संपादकीय

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा!

चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ शोभा वाघमारे या महिलेवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. या महिलेवर भटक्या कुत्र्यांनी इतका जबरदस्त हल्ला केला की, महिलेला बचावाची संधीदेखील मिळाली नाही. भटक्या कुत्र्यांनी या महिलेचे अक्षरशः लचके तोडले.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून, भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. अर्थात, भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात जीव गमावलेल्या या पहिल्या व्यक्ती नाहीत. तीन वर्षांपूर्वी वाघ बकरी चहा कंपनीचे संचालक पराग देसाई यांचाही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. पराग देसाई यांच्या मृत्यूनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनातर्फे ठोस पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. कारण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनातर्फे कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. उलट भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेले पराग देसाई आणि शोभा वाघमारे हे दोघेच नसून याआधीही अशा अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत आणि त्यात काहींचा जीवही गेला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणार्‍यांची संख्या तर अगणित आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज सहा हजारांहून अधिक लोक जखमी होतात, अशी सरकारी आकडेवारीच आहे.
दररोज सहा हजारांहून अधिक लोक जर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होत असतील तर ती मोठी गंभीर बाब आहे. केवळ शहरातच नाही, देशातील गावागावांत भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत आहे. गाव असो वा शहर, चाळ असो वा सोसायटी, पायवाट असो वा महामार्ग, चौक असो वा नाका सर्वत्र तुम्हाला भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असलेल्या दिसतील. हे भटकी कुत्री रस्त्यांवरून जाणार्‍या लोकांवर अचानक हल्ला करतात. विशेषतः शाळकरी मुले, वृद्ध, अपंग व महिलांना भटके कुत्रे
टार्गेट करतात.
दबा धरून बसलेले भटके कुत्रे अचानक घेराव घालून हल्ला करतात. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लोक अक्षरशः रक्तबंबाळ होतात. भटक्या कुत्र्यांच्या चावण्याने रेबीज नावाचा रोग होतो. या रोगावर जर वेळीच उपचार केला नाही तर रोगी दगावण्याचीदेखील शक्यता असते. मात्र, अनेक सरकारी रुग्णालयांत रेबीजवरील लसच उपलब्ध नसते. ग्रामीण भागात तर हे नेहमीचेच चित्र आहे. भटक्या कुत्र्यांची दहशत केवळ रस्त्यांवरून जाणार्‍या लोकांनाच आहे असे नाही, तर पाळीव प्राण्यांनादेखील आहे. शेळी, मेंढी, कोंबड्या यांसारख्या पाळीव प्राण्यांवरदेखील भटकी कुत्री हल्ले करतात. भटक्या कुत्र्यांच्या झुंडी अचानक येऊन पाळीव प्राण्यांचा फडशा पाडतात. भटक्या कुत्र्यांचा त्रास वाहनचालकांनाही होतो.
विशेषतः दुचाकीस्वारांना भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत आहे. रस्त्यांवर दुचाकी दिसली की भटकी कुत्री वाहनांच्या मागे धावतात, वाहनांना आडवे येतात. त्यामुळे बर्‍याचदा अपघात होतो आणि त्या अपघातात वाहनचालक जखमी होतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत असते. मात्र, त्यावर प्रशासन गंभीर नसते. खूपच मागणी झाली किंवा प्रसारमाध्यमांतून आवाज उठवला तर दिखाव्यासाठी कारवाई केली जाते. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण नियमित केले जाते, असे प्रशासनामार्फत सांगितले जाते. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. जर भटक्या कुत्र्यांचे निबीर्र्जीकरण नियमित केले जाते तर मग देशातील भटक्या कुत्र्यांची संख्या का वाढत आहे, असा प्रश्न आहे. एकट्या मुंबईचे उदाहरण घेऊ. 2014 साली मुंबईत 95 हजार भटकी कुत्री होती. आज त्यांची संख्या एक लाख 64 हजार आहे. याचाच अर्थ मागील बारा वर्षांत मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या 72 टक्क्यांनी वाढली.
जर भटक्या कुत्र्यांची संख्या अशीच वाढत राहिली आणि त्यांचे नागरिकांवर होणारे हल्लेदेखील वाढत राहिले तर भविष्यात मानव विरुद्ध भटकी कुत्री, असा संघर्ष निर्माण होऊ शकतो. तो होऊ द्यायचा नसेल तर शासन, प्रशासनाने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाय योजायला हवेत. केवळ निर्बीजीकरण केल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होणार नाही, हे सिद्ध झाले आहे.
प्राणिमित्र संघटनांनीही या प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. भटक्या कुत्र्यांना सहानुभूती दाखवताना त्यांच्या हल्ल्यात जखमी होणार्‍या नागरिकांकडेदेखील सहानुभूतीने पाहायला हवे. आपल्या देशात 2001 साली प्राणी कल्याण कायदा लागू झाला. या कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना संरक्षण मिळाले. भटक्या कुत्र्यांना ते आहेत त्या ठिकणापासून कोणीही हलवू शकत नाही. शिवाय त्यांना त्याच ठिकाणी खायला घालणे अनिवार्य करण्यात आले. या कायद्यामुळे भटक्या कुत्र्यांना तर संरक्षण मिळाले, पण नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव वाढला. भविष्यात हा उपद्रव आणखी वाढणार आहे. म्हणूनच या कायद्याचा मान राखून नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव कसा रोखता येईल, यासाठी कोणता मध्यममार्ग काढता येईल याकरिता सरकारने समिती नेमावी. प्राणिमित्र संघटनेच्या सदस्यांसह तज्ज्ञांचा समावेश या समितीत करावा. या समितीने योग्य मार्ग काढून भटक्या कुत्र्यांना संरक्षण देऊन
त्यांच्यापासून नागरिकांना होणारा उपद्रव थांबवावा.

Control stray dogs!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

3 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

3 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

3 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

4 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

4 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

4 hours ago