लाईफस्टाइल

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं काही आपल्या मनासारखं होईलच असं नाही. पण राग येणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं- यात फार मोठा फरक आहे. रागावर जर वेळीच नियंत्रण मिळवता आलं नाही, तर तो आपल्यावरच उलटतो आणि त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात. आजूबाजूला पाहिलं, तर अनेक दु:खद घटना घडताना दिसतात. लहानग्यांपासून ते तरुणांपर्यंत अनेकांनी फक्त रागाच्या भरात, अपमान किंवा तणावातून टोकाचं पाऊल उचललेलं आपण पाहतो. काही दिवसांपूर्वीच एका बारा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. कारण त्याच्यावर चोरीचा आळ घेण्यात आला. कारण आईनेच सर्वांसमोर मारल्यामुळे, शिवीगाळ केल्यामुळे त्याला अपमानित केलं आणि त्याच दुःखाने त्याने आपलं आयुष्य संपवलं. ही केवळ बातमी नव्हे, तर एक सामाजिक थरारक सत्य आहे.
रागावर नियंत्रण ठेवणं म्हणजे राग नाही येणार असे नव्हे, तर तो योग्य पद्धतीने, सुसंस्कृतपणे व्यक्त करणं होय. यासाठी सर्वप्रथम आपलं मन शांत ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी रोज काही वेळ ध्यान करणे खूप फायदेशीर ठरते. ध्यानामुळे मन एकाग्र राहतं आणि रागाची तीव्रता कमी होते. रागाच्या क्षणी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही सेकंद शांत राहण्याची सवय लावली, तर त्याचा परिणाम सकारात्मक दिसतो. उदा. मनात एक ते दहा मोजणं ही साधी कृती आपल्याला विचार करायची संधी देते आणि चुकीचं बोलणं किंवा वागणं थांबवू शकते.
राग आल्यावर खोल श्वास घेणे आणि त्यावर लक्ष केंद्रित करणे हासुद्धा एक प्रभावी उपाय आहे. श्वासाचा वेग कमी झाला की, मन स्थिर होतं. याशिवाय राग का आला, कशामुळे आला हे शांतपणे लिहून काढण्याची सवय लावली, तर तो राग योग्य वाट करून घेतो. लिहिल्याने मन मोकळं होतं आणि कुणालाही दुखावल्याशिवाय भावना व्यक्त होतात. जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सतत टोचून बोलण्याचा असेल, तर शक्य असेल तितकं त्याच्यापासून अंतर ठेवावं. काही वेळा नकारात्मक लोकांचा सहवास हा राग वाढवण्यास कारणीभूत ठरतो.
शारीरिक हालचाल आणि व्यायाम रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. चालणं, धावणं किंवा योगासनं केली, तर शरीरातील ताण कमी होतो आणि मन अधिक सुसंयत राहतं. त्याचबरोबर क्षमा करण्याची वृत्ती अंगी बाळगली तर मन शांत राहतं. रागाच्या मुळाशी बर्‍याचदा दुखावलेलं मन असतं. तेव्हा ज्यांनी त्रास दिला त्यांना माफ करून स्वतःला मोकळं करणं ही रागावर मात करण्याची मोठी शक्ती ठरते.
या सर्व गोष्टी शिकवणं ही फक्त व्यक्तिगत जबाबदारी नाही. घर, शाळा, समाज यांचीसुद्धा भूमिका आहे. मुलांच्या भावना समजून घेणं, त्यांचं ऐकणं आणि त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण देणं, हे पालकांनी आणि शिक्षकांनी केले पाहिजे. आजचा तरुण अपयश पचवू शकत नाही. कारण त्याला ते स्वीकारण्याचं प्रशिक्षण मिळालेलं नसतं. त्याच्या मनासारखं काही नाही झालं, ब्रेकअप झालं की, तो लगेच आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे झुकतो. त्याला हे शिकवायला हवं की, संघर्ष हीच खरी जीवनाची शाळा आहे. प्रत्येक गोष्टीत लगेच यश मिळेलच असं नाही, पण त्या अपयशातून शिकून पुढे कसं जायचं, हे समजायला हवं.
रागावर नियंत्रण ठेवणं म्हणजे तो दडपणं नव्हे, तर त्याला योग्य दिशा देणं होय. जर आपण प्रत्येकाने थोडीशी जाणीव ठेवून स्वतःला रोज थोडं-थोडं सुधारलं, तर अशा टोकाच्या घटना टाळता येतील. आपलं मन आणि भावना यावरच खरं नियंत्रण मिळवणं हेच खरं आयुष्याचं शस्त्र आहे.

      शीतल कारे, नाशिक

 

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

11 hours ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

17 hours ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

17 hours ago

श्रावण सफल व्हावा…

श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्‍याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…

17 hours ago

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

2 days ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

2 days ago