आपल्याकडे फेब्रुवारी – मार्च हा परीक्षांचा काळ असतो. या महिन्यात परीक्षा पार पाडण्याची जणू परंपराच आहे. दहावी – बारावी या बोर्डाच्या परीक्षा याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन यांसारख्या स्पर्धा परीक्षादेखील याच काळात होतात. यावर्षी बारावीची बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, ती 11 मार्चला संपणार आहे, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे.
या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड असतात. विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणार्या या परीक्षा असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. यावर्षीही लाखो विद्यार्थी दहावी – बारावीची परीक्षा देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मन लावून अभ्यास केलाय, ते विद्यार्थी या परीक्षांना बेधडकपणे सामोरे जातात. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झाला नाही ते विद्यार्थी गैरमार्गाने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतात. त्यातीलच एक गैरमार्ग म्हणजे कॉपी. दहावी, बारावीच्या परीक्षेत दरवर्षी हजारो विद्यार्थी कॉपी करताना आढळतात. काहींवर कारवाई होते तर काहींना समज देऊन सोडून दिले जाते. मात्र, कॉपीची ही कीड मुळापासून उखडून टाकली जात नाही. कॉपी ही आपल्या शिक्षणव्यवस्थेला लागलेली कीड आहे. वर्षभर अभ्यास न करता परीक्षेच्या दिवशी कॉपी करून उत्तीर्ण होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. ही धोक्याची घंटा आहे, म्हणूनच खुद्द पंतप्रधानांनादेखील यात लक्ष घालावे लागले होते.
मागील वर्षी ‘मन की बात’ या आपल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी याच विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी कॉपी केल्याने आयुष्य घडवता येत नाही, असा कानमंत्र दिला होता. कॉपी करून आपण एखादी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, मात्र जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कॉपी नव्हे तर अपार मेहनतच करावी लागते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही, असा संदेशही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचा हा संदेश अमलात आणला नाही, असेच म्हणावे लागेल. कारण सध्या चालू असलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक भागात मास कॉपी झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचायला मिळाली.
बीड, जालना यांसारख्या शहरांत कॉपीमुक्त परीक्षा या शिक्षण विभागाच्या अभियानाला हरताळ फासला गेला. अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी कॉपी करताना आढळले. काही परीक्षा केंद्रांवर मास कॉपी होत असल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला. याप्रकरणी काही पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांवर शिक्षण विभागाने कारवाईदेखील केली आहे. दहावी – बारावी परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी शिक्षण विभाग विविध पावले उचलत असताना विद्यार्थ्यांकडून त्यास पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, असेच म्हणावे लागेल. दरवर्षी कॉपी करणार्या मुलांची संख्या वाढतच चालली आहे. कॉपीची कुप्रथा कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी कॉपीच्या या कुप्रथेचे आवर्जून पालन करतात. काही ठिकाणी तर काही शाळा आणि संस्थादेखील निकाल चांगला लागावा म्हणून या कुप्रथेला प्रोत्साहन देतात.
काही पालकही आपल्या पाल्यांना कॉपी पुरवण्यासाठी जीवाचे रान करतात. शाळेच्या, परीक्षा हॉलच्या बाहेर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी उसळते. झेरॉक्स दुकानांवरदेखील तेवढीच गर्दी असते. अर्थात, परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून प्रशासन
सर्वतोपरी प्रयत्न करते हे मान्यच करावे लागेल. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे अभियान राबवले जाते. भरारी पथक हे त्यापैकीच एक अभियान. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना काही अधिकारी बोर्डाकडून नेमले जातात. हे अधिकारी परीक्षा केंद्रावर अचानक भेटी देऊन परीक्षा केंद्रावर धाक बसवतात. कॉपी करताना कोणी विद्यार्थी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यांचे थेट निलंबन केले जाते. पण, कॉपीबहाद्दरांना तुरुंगात टाकण्याची तरतूद आपल्याकडील कायद्यात नाही. मात्र, देशातील काही राज्यांत कॉपी करणार्या विद्यार्थ्यांना थेट तुरुंगात पाठवण्याचा कायदा आहे. आपल्याकडेदेखील आता कॉपी करणार्या विद्यार्थ्यांना वचक बसावा आणि राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्णय
घेतले आहेत.
कॉपीमुक्त अभियानासाठी राज्य सरकार जे प्रयत्न करीत आहे, ते स्वागतार्ह असले तरी कठोर कायदे करूनच कॉपीला आळा घालता येईल असे नाही, तर कॉपी करू नये यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करायला हवे. कॉपी करणारा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो, मात्र जीवनाच्या परीक्षेत तो उत्तीर्ण होऊ शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक पावलावर परीक्षा असतात. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी कॉपी नव्हे तर कठोर मेहनतच घ्यावी लागते. कठोर मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कॉपीसारख्या कुप्रथेला मूठमाती द्यावीच लागेल.
Copying is a pest in the education system.
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…