सावधान…मध्यस्थी कराल तर जीव गमवाल!

नाशिक : देवयानी सोनार

एखाद्याच्या भांडणात मध्यस्थी करणे जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय पंचवटी आणि भारतनगर येथील घटनावरुन आला आहे. त्यामुळे मध्यस्थी करायची की नाही? असा विचार करावयास लावणार्‍या या घटनांमुळे समाजमन ढवळून निघाले आहेत. पोलिसांनी आता या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पंचवटीच्या म्हसरूळ भागात मागील पंधरवड्यात भांडणामध्ये मध्यस्थी करावयास गेलेल्या यश गांगुर्डे याचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. तर काल शिवाजीवाडी भारतनगर येथेही प्रेम प्रकरणातून मध्यस्थी करणे सागर राउतर या अवघ्या वीस वर्षाच्या मुलाला चांगलेच महागात पडले. मध्यस्थी करतो म्हणून भारत भोये,गणेश भोये, गौतम भोये या तिघांनी सागरवर जीवघेणा हल्ला केला. यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. त्यामुळे घाव वर्मी लागल्याने सागरचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. यापूर्वीही केवळ मध्यस्थी करण्यावरुन मारहाण करण्याबरोबरच खूनाच्या घटना घडलेल्या आहेत. एखाद्या प्रकरणात दोन्ही बाजूनी मध्यस्थाची भूमिका बजावणे तसे चुकीचे नाहीच. वाद विकोपाला जाऊ नये, हा त्यामागील मध्यस्थाचा प्रामाणिक हेतू असतो. रस्त्यावर हाणामारी सुरू असतानाही अनेकजण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना ठायी ठायी दिसतात. त्यातून वादाचे प्रसंग बर्‍याचदा टळतातही. मात्र, काही प्रकरणांमध्ये दोघांच्या भांडणात तिसर्‍याचाच बळी जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने मध्यस्थी करणेही जीवघेणे ठरु शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून या प्रकरणांकडे पाहावे लागेल. कोणताही वाद विकोपाला गेला की रागाच्या भरात मध्यस्थावरच तो राग व्यक्त होत असतो. त्यामुळे भांडणात मध्यस्थी करावी की नाही? असा प्रश्‍नही बर्‍याचदा निर्माण होतो. त्यातूनच रस्त्यावर एखादी तुंबळ हाणामारी सुरू असली तरी कोणी सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. विनाकारण यातून दोघांच्या भांडणात तिसर्‍यालाच त्याचा त्रास होतो. अशी मानसिकता निर्माण होऊ शकते. रागाच्या भरात मध्यस्थावरच सगळा राग निघत असल्याने मध्यस्थी करत असाल तर सावधान असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. शहरात सातत्याने सुरू असलेल्या खूनाच्या प्रकरणात बरेचसे प्रकरणे हे एकतर जुने वाद अथवा प्रेमप्रकरण अथवा आर्थिकशी संबधितच असतात. गंगापूररोडला झालेल्या युवकाचा खूनही संशयितांच्या वडिलांकडे चुगली करतो म्हणून झाला होता. अलिकडच्या काळात युवकांमध्ये राग येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यातून हाणामार्‍या, खूनासारख्या गुन्ह्यात त्याचे परिवर्तन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *