संपादकीय

हळदी-कुंकू समारंभातील धार्मिकता जोपासा!

हिंदू धर्मातील केवळ एक सण वगळता सर्व सण हे प्राचीन कालगणनेनुसार कोणत्या ना कोणत्या तिथीला येतात. सौर कालगणनेनुसार येणारा एकमेव हिंदू सण म्हणजे मकरसंक्रांत. सूर्य या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. दरवर्षी मकरसंक्रांत 14 जानेवारीला साजरी करण्याचा प्रघात आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी काही वेळा संक्रांत एक दिवस पुढे ढकलली जाते म्हणजे 15 जानेवारीला असते. एकमेकांमधील हेवेदावे विसरून तीळगूळ खाऊन गोड बोलण्याचा संदेश देणारा हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण आहे. मकरसंक्रांतीला हिंदू धर्मात देवता मानले जाते. या देवतेने संकरासुर नावाच्या दैत्याला ठार मारले. तो दिवस संक्रांत आणि दुसर्‍या दिवशी किंकरासुराला ठार केले, तो दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायणात मृत्यू येणे अधिक चांगले समजले जाते. शरशय्येवर 58 दिवस पडून असलेल्या पितामह भीष्मांनीसुद्धा उत्तरायण सुरू झाल्यानंतर देहत्याग केला.
मकरसंक्रांतीच्या दिवसापासून पुढे रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी-कुंकू करण्याचा प्रघात आहे. एरवी एकमेकींची उणीधुणी काढण्याची एकही संधी न सोडणार्‍या महिला शेजारपाजारच्या सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळद- कुंकू लावतात आणि वाण म्हणून एखादी वस्तू देतात. सुवासिनीच्या रूपात साक्षात देवीचे घरी आगमन झाले आहे या भावनेने आलेल्या सुवासिनीला हळद-कुंकू लावून तिचे पूजन केले जाते. फूल, गजरा किंवा वेणी देऊन तिला नमस्कार केला जातो. तिला वाण दिले जाते. वाण देणे हे त्यागाचे प्रतीक आहे. घरी आलेल्या दुर्गारूपी सुवासिनीच्या पूजनानंतर तिला तन-मन-धन समर्पित करत आहोत, या भावनेने प्रतीकात्मक वस्तू म्हणून वाण दिले जाते.
गेल्या काही वर्षांपासून हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सार्वजनिकरीत्याही साजरे केले जाऊ लागले आहेत. हाऊसिंग सोसायट्या, सार्वजनिक उत्सव मंडळे, महिला बचतगट, मंदिर समित्या, राजकीय पक्ष, संघटना यांच्या वतीने प्रतिवर्षी हळदी कुंकूंचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने काही ना काही वस्तू वाण म्हणून दिली जाते. बजेट ठरवून वाण म्हणून दिल्या जाणार्‍या वस्तूंमध्ये बर्‍याचदा फण्या, प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकच्या डिश, स्टीलच्या वाट्या, चमचे, साबण, साबणघर यांसारख्या असात्त्विक वस्तू दिल्या जातात. सुवासिनीला हळद-कुंकू लावताना आदिशक्ती म्हणून तिचे पूजन केले जाते. अशा आदिशक्तीला असात्त्विक वस्तू वाण म्हणून देणे अयोग्य आहे. हळदी-कुंकू हा धार्मिक कार्यक्रम असल्याने वाण म्हणून दिल्या जाणार्‍या वस्तूही सात्त्विक असायला हव्यात. उदबत्त्या, उटणे, कापूर, वाती, पोथी, देवतांच्या कथा आदी वस्तू भेट म्हणून द्याव्यात. सार्वजनिक हळदी-कुंकू साजरे करताना आयोजकांकडून महिलांंना आकर्षित करण्यासाठी गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, नाव घेण्याच्या स्पर्धा यांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम हळदी-कुंकू समारंभाच्या सोबतीला ठेवले जातात. यातून मनोरंजनाखेरीज अन्य काहीच साध्य होत नाही. सध्याची सामाजिक स्थिती पाहता महिलांंवरील अत्याचाराचा आलेख दिवसागणिक वाढतो आहे.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे सध्याच्या मुली भारतीय संस्कृतीपासून दुरावू लागल्या आहेत. पुरुषांशी बरोबरी करण्याच्या नादात स्वतःतील शक्तीसम स्त्रीत्वाचा त्यांना विसर पडू लागला आहे. दिवसाढवळ्या मुलींचे अपहरण होऊ लागले आहे. स्त्रियांमधील भावनिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक केली जाऊ लागली आहे. लव्ह जिहादसारखे संकट प्रत्येक क्षेत्रात सावज शोधत आहे. अशावेळी स्त्रीशक्तीचा केवळ मनोरंजनामध्ये अपव्यय करण्याऐवजी स्त्रियांना सर्वार्थाने सक्षम होण्यासाठी प्रेरणा देणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास स्त्रियांना अधिक लाभ होईल. हिंदू धर्माची आणि प्राचीन अशा भारतीय संस्कृतीची महती सांगणारी व्याख्याने, आचारधर्माचे आणि धार्मिक कृतींचे महत्त्व सांगणारी प्रवचने आणि संकटकाळात स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ बनण्यास शिकविणारी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके यांसारख्या उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे.
जेणेकरून हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकत्र येणार्‍या महिला भविष्यात एकमेकांच्या सहाय्यासाठीही संघटित होतील. काही वर्षांपासून हळदी-कुंकूसारख्या धार्मिक समारंभाचाही इव्हेंट केला जाऊ लागला आहे. पुढार्‍यांकडून आलिशान सभागृह किंवा मोठे मैदान आरक्षित करून महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले आहेत.
महिलांना आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमांना चित्रपटांतील आणि मालिकांतील अभिनेत्रींना सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलावले जाते. महिलांच्या मनोरंजनासाठी ’होम मिनिस्टर’ किंवा अन्य विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. नृत्यासाठी वाद्यवृंदाची व्यवस्था करण्यात येते. काही ठिकाणी तर आलेल्या महिलांच्या जेवणाचीही सोय आयोजकांनी केलेली असते. अशा समारंभांना प्रमुख पाहुणे म्हणून येणारी राजकीय मंडळी महिलांची गर्दी पाहून लांबलचक भाषणे द्यायला सुरुवात करतात. नवरात्री, दहीहंडीप्रमाणे आता हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमांचा इव्हेंट करून त्यातील धार्मिकता नष्ट होऊ देऊ नका.

Cultivate piety in the turmeric-skunk ceremony!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago