नाशिक

‘दादा’ गेले; पुरोगामी महाराष्ट्राच्या नेतृत्वाची अपरिमित हानी

राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रांतून शोकभावना; आठवणींना उजाळा

नाशिक : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुरोगामी विचारांचे ठाम प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे ‘दादा’ अर्थात अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जातीपातीच्या संकुचित राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी, समता आणि लोककल्याणाचा विचार जपणारे नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. सामान्य कार्यकर्ता, शेतकरी, अधिकारी व विरोधकांशीही आपुलकीने संवाद साधणारे ‘दादा’ हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते, अशी भावना येथे व्यक्त करण्यात आली.

छगन भुजबळ म्हणाले, की वेगवेगळ्या संस्था, शासन, पक्षाच्या भिंती दूर करून श्रद्धांजली अर्पण केली. आदल्या दिवशी प्री-कॅबिनेटला अर्धा दिवस आम्ही सोबत होतो. पेपर वाचताना समीर जवळ आला आणि सांगितले अपघात झाला. देशात विमानाचे, हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले. महाराष्ट्रात अशा प्रकारचा एवढ्या मोठ्या व्यक्तीचा अपघात पहिल्यांदा झाला. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस व मीदेखील विमान अपघातात वाचलो आहोत. चौकशी होईल, सत्य बाहेर येईल. रडार किंवा इंजिनचा प्रॉब्लेम असू शकतो. सोन्यासारखी माणसं कशी वापस येतील?
अजितदादांनी आयुष्यभर संघर्ष केला. पवार साहेबांकडून त्यांनी गुण घेतले. सकाळी 6-7 ला मीटिंग घ्यायचे. स्वच्छता, टापटीपणाची त्यांना आवड होती.
सन 1993 पासून एकत्रित आम्ही काम केले. एकमेकांना धीर देत खंबीरपणे उभे राहिलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एका विषयासंदर्भात शासनाची भूमिका नरमाईची आहे असे मला वाटले. मी राजीनामा पाठवला. त्यावर अजित पवार म्हणाले, की तुम्हाला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. राजीनामा देऊ नका. बीजेपीबरोबर येतो, पण शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर काम करणारी आम्ही माणसं आहोत, हे त्यांनी सांगितले.

सतत काम करणारा माणूस होता. दादा 66 वर्षे जगले, पण मी म्हणेन दादा 76 वर्षे जगले. कारण ते सतत काम करत असायचे. कार्यकर्त्यांची, पक्षातील नेत्यांची कुटुंबप्रमुखासारखी काळजी घ्यायचे.
– मंत्री नरहरी झिरवाळ

दुर्दैवाने श्रद्धांजली अर्पण करावी लागली. विश्वास बसत नाही. आताही असं वाटतंय मीटिंग घेत असतील. सभा घेत असतील. अजित पवार सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत काम करायचे. टाइम मॅनेजमेंटचा बादशाह होते. प्रत्येक कार्यक्रमाला वेळेत आधी उपस्थित राहत होते. पुन्हा असे नेतृत्व-कर्तृत्व होणे नाही. नेतृत्व तयार व्हायला एक काळ जातो. दादांसारखा नेता होणे नाही. आमचं आयुष्य आणि भविष्य पोरकं झाले. महाराष्ट्राचे नुकसान झाले. दादा जे निर्णय घ्यायचे ते सर्व आमदारांना मान्य असायचे. जमिनीवर राहून काम करणे ही कला दादांना जमली. त्यांचे विचार पुढे नेणे, हीच आमची जबाबदारी आहे.
– माजी मंत्री माणिकराव कोकाटे

आम्हाला जे योग्य वाटले ते आम्ही एकत्रित बसून केले. एकमताने सुनेत्रा पवार यांचेच नाव समोर आले. निर्णय लवकर झाला. उशीर झाला या भानगडीत न पडता आमचा निर्णय योग्य आहे की नाही ते सांगा, असे म्हणत शपथविधीवर टीका करणार्‍यांना उत्तरे दिले. सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चा थांबवा, अशी हात जोडून विनंती करतो. कारण नसताना आता चर्चा होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल.
– मंत्री छगन भुजबळ

दादांच्या मार्गावर वाटचाल करू. दादांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांची उणीव भरून काढणे अशक्य आहे. शो मस्ट गो ऑन. दादांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करू, अशा भावना क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, माकपाचे अ‍ॅड. तानाजी जायभावे, के. के. वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ यांनी व्यक्त केला.

दादांनी खूप मोठा आधार दिला होता. दिव्यांगाला कुबड्या नसल्यावर जसे वाटेल तसे वाटत आहे. पोरकी झाल्याची भावना आहे.
– आमदार सरोज आहिरे

दादांना शेतकर्‍यांची आस्था होती. त्यांनी जातीपातीचे राजकारण केले नाही. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात काम करत असताना त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली. नाशिकवर प्रेम होते. निफाडमधील नांदूरमध्यमेश्वर धरणाचा प्रश्न दादांमुळे मिटला. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. – आमदार दिलीप बनकर

विधिमंडळात काम करत असताना अनुभव आला. 25-30 वेळा दादांकडे जाण्याचा योग आला. विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
– बाळासाहेब सानप, माजी आमदार

हिमालयासारखं नेतृत्व होतं. तसा माझा संबंध कमी आला. माझ्या कुटुंबाचा त्यांच्याशी खूप संबंध होता. एका कामानिमित्त 20 जानेवारीला भेटण्यासाठी वेळ मागितली होती. वेळ मिळालीपण होती. पण मी भेटीसाठी जाऊ शकलो नाही, ही खंत कायम राहील.
– आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने दादांच्या भेटीचा योग आला होता. धडाडी, हजरजबाबीपणा हे त्यांचे गुण प्रभावी होते.
– सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप

दादा नाशिक दौर्‍यावर असताना पाथर्डी फाटा येथे स्वागतासाठी थांबलो होतो. त्यावेळी दादा म्हणाले, एकही कार्यकर्ता उपाशी राहता कामा नये. कार्यकर्त्यांना जपणारा माणूस होता. दादांचे विचार पुढे नेऊ. हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल.
– सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे

प्रशासनावर पकड असलेले प्रभावी राजकीय नेते होते. प्रत्येक प्रश्नाची जाण असायची.
– अविनाश आव्हाड, बिल्डर असोसिएशन

वक्तशीरपणा हा दादांचा स्वभाव होता. काम थांबलं नाही पाहिजे, ही त्यांची भूमिका असायची.
– राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा

अजूनही विश्वास बसत नाही. आमचे दादा गेले. बारामतीचा प्रत्येक नागरिक म्हणतो, आमचे दादा गेले. राजकारणात नसलेल्यांनापण दादा गेल्याचे दुःख झाले आहे.
– देवदत्त जोशी

दादांना न बोलता कशासाठी आला, काय काम आहे याचा अंदाज यायचा. कोल्हापूरला शाहू बोर्डिंगमध्ये त्यांचे शिक्षण झाले. प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यासारखी गती कुठेच नाही. दादांमध्ये स्पष्टवक्तेपणा होता. शेवटच्या क्षणापर्यंत पुरोगामी आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबाची नाही, तर पूर्ण महाराष्ट्राची हानी झाली आहे.
– भगीरथ शिंदे

लहान भावाप्रमाणे जवळ घेतले. आपला मोठा भाऊ आपल्यामध्ये नाही राहिला, असे वाटले. माणिकराव कोकाटे प्रकरणात तुम्ही स्वतः लक्ष द्या, असे म्हणाले होते. सरोज माझी लहान बहीण. तिची काळजी घ्यायची. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत असायचे.
– संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक

दादांचे निधन ही धक्कादायक बातमी होती. प्रशासनातील अधिकार्‍यांचे आधार दादा होते. प्रशासन व राजकीय मतभेद असताना, अधिकार्‍यांना मत व्यक्त करण्यांचे स्वातंत्र्य होते. सकाळी मीटिंग असली तरी वेळेत आधी यायचे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी जाणवणार आहे. – डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक

मागील जवळपास पंचवीस वर्ष विविध विभागांत काम करत असताना त्यांच्यासोबत कामकाज करण्याचा अनुभव आला. आदिवासी विकास धान उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न दोन मिनिटांत समजून घेऊन मार्गी लावला होता. – लीना बनसोड, आदिवासी आयुक्त

गडचिरोलीनंतर सातारा येथे बदली झाल्यानंतर त्यांच्यासोबत कामकाजाचा अनुभव आला. पिंपरी-चिंचवडमध्ये काम करताना अनुभव होता. प्रत्येक कामाचा प्रचंड पाठपुरावा ते करत असत. प्रेमळ व भावनिकरीत्या समजून सांगायाचे. – शेखर सिंह, कुंभमेळा आयुक्त

‘Dada’ is gone; an immense loss to the leadership of progressive Maharashtra

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago