आखाती युद्धाचा परिणाम; दुधाला अपेक्षित दर नसल्याने अर्थकारण कोलमडले
लासलगाव : समीर पठाण
पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकर्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे. ज्यामुळे शेतकर्यांना आता दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवसायाचा शोध घ्यावा का, असा विचार दूध उत्पादक शेतकरी करीत आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून लासलगावसह परिसरात अनेक शेतकरी कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय करतात. या व्यवसायामुळे येथील तरुण शेतकर्यांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. मात्र, सध्याच्या महागाईत दुधाळ जनावरांना देण्यात येणारा पशुआहार महागल्याने येथील शेतकर्यांना आता दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण होऊ लागले आहे. परिणामी, दूध उत्पादक शेतकर्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाल्याचे सध्या
चित्र आहे.
पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकर्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.
येथील दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व जोडव्यवसाय म्हणून केला जातो. या व्यवसायावर अनेक शेतकर्यांचे अर्थकारण अवलंबून असते. लासलगावसह परिसरातील गावात म्हैस आणि संकरित गायींचे प्रमाण अधिक आहे. मात्र, दूध उत्पादक शेतकरी सध्या पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.
खाद्याच्या तुलनेत दुधाला भाव अपुरा
वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा भावही अत्यंत कमी आहे. सध्या म्हशीच्या दुधाचा दर फॅटनुसार किमान 60 रुपये प्रतिलिटर, तर गायीच्या दुधाचा भाव किमान 50 रुपये प्रतिलिटर आहे. पशुखाद्याच्या वाढत्या किमतीच्या तुलनेत हा भाव अगदी अपुरा आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे पशुखाद्य महागले आहे. मात्र, दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने खर्चाचा ताळमेळ घालणे चांगलेच जिकिरीचे झाले आहे, तसेच पशूचा चारा व कुट्टी भरून ठेवण्यासाठी लागणार्या प्लास्टिक बॅग व त्यातील इनरदेखील सत्तर टक्क्यांनी महाग झाले आहेत. तसेच सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरांच्या देखभालीनेही मेटाकुटीला आलो आहे. पर्यायी व्यवसायाचा शोध घ्यावा का, असा विचार दूध उत्पादक शेतकरी करत आहेत.
-सुनील गवळी, शेतकरी, ब्राह्मणगाव (विंचूर)
पशुखाद्याचा भाव
कडबा सिंगल कुट्टी – 2,500 ते 2,800
मुरघास – 8,000 ते 10,000 प्रतिटन
सरकी पेंड – 1,200 ते 1,400 प्रति 40 किलो
शेंग पेंड – 1,300 ते 1,700 प्रति 40 किलो
मका कुट्टी – 1,150 प्रति 45 किलो
Dairy cattle are difficult to maintain due to high feed prices