दिस येतील, दिस जातील

– सविता एरंडे

निसर्ग हसला, सजला, नटला…
पर्णोपर्णी ऋतू बहरला….
असंच हवंहवंसं, डोळ्यांना व मनाला श्रांत व तजेला देणारं वसंत ऋतूचं वैभव! ग्रीष्मात उन्हाचे चटके सहन करत पिवळ्या धमक सौंदर्याचं दान देणारा देखणा बहावा, अंगोअंगी बहरलेला लाल चुटक गुलमोहर, प्रत्येक पाना आडून हसणारा मोगरा असा मनमोहित करणारा निसर्ग कायमच आपल्या सोबत राहाणार नाही, हे माहीत असूनही आपण ते वैभव भरभरून लुटत असतो. मुक्त हस्ते दान देणारा हा निसर्ग मात्र अतिशय लहरी आहे. चंचल आहे. तो एकदा कोपला तरी सर्वांची दाणादाण उडवतो. सगळ्यांना उद्ध्वस्त करतो.
कोरोनाचं संक्रमण सर्वांनी अनुभवलं आहेच! पूर, भूकंप, यामुळं गावंच्या गावं उद्ध्वस्त होतात.जनजीवनाची अखेर होण्याची वेळ येते. पण मानव आशावादी आहे.. तो हरत नाही, तुटत नाही. तो पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतो आणि नव्यानं जगण्याचा प्रयत्न करत म्हणतो. दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल… शापित चित्रपटातील या गाण्यातील आशावाद मनाला नेहमीच उभारी देतो. नव्यानं पुढं पाऊल टाकण्याची प्रेरणा देतो. आपल्या डोळ्यापुढं अशी अनंत उदाहरणं आहेत की त्यांनी दिस जातील, दिस येतील, हा मंत्र प्रत्यक्ष कृतीतून जागवला व सिध्द करून दाखविला. निराधारांना मायेचं आभाळ देणार्‍या सिंधुताई सपकाळ, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, आपल्याला वंदनीय असलेले सर्व थोर नेते, स्वातंत्र्यसैनिक, स्वराज्य स्थापनेसाठी प्राणांची बाजी लावणारे सर्व राजे,महाराजे….या सर्वांच्या चरित्रांमधून त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा, हलाखीच्या परिस्थितीतून स्वतः चं शोधलेलं ध्येय क्षितिज…हे सर्व वाचलं की आपण सामान्य मानव त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो.या सर्व ध्येय साध्य करणार्‍या महामानवांमुळे आज आपण सुखेनैव जीवन जगतो आहोत….कारण हे सर्व महामानव आशावादी होते. हा काळोख संपेल व नक्कीच यशसूर्य उगवेल ही आशेची ज्योत त्यांच्या मनात कायमची तेवत होती. परिस्थितीला शरण न जाता या सर्वांनी जिद्दीने, दुःखाचे डोंगर पार करत यशोशिखरावर यशनिशाण उभारलं.
हे दिवस ही लवकरच जातील हा आशावाद नक्कीच पुढं पाऊल टाकण्याची प्रेरणा देतो. सुख कधीच एके ठिकाणी राहात नाही आणि दुःखही कधीच कायमचं भोगावं लागत नाही. सुखदुःखाचा हा लपंडाव मानवी जीवनात अविरत चालूच असतो… म्हणून तर नवीन वाट शोधण्यासाठी आपलं पाऊल पुढं पडतं. जगण्याची हिंमत अंगी येते.
दिस जातील, दिस येतील हा खरंतर जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे. बर्‍याच वेळा एखाद्या गोष्टीत अपयश आलं की, मनावर झालेला जोरदार आघात सहन होत नाही. कधीकधी दुःखाचा कडेलोट होतो. दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचं अपयश मनाला कमकुवत बनवतं आणि मग असे खचून गेलेले विद्यार्थी अविचाराने आपलं जीवन संपवतात. शेतकरी लोक कर्जबाजारी झाले की त्यांनाही हा आघात सहन होत नाही आणि तेदेखील मरणाला जवळ करतात. अशी अनेक उदाहरणं आपण समाजात, आपल्या अवतीभवती पाहतो. अनुभवतो. मग अशा वेळी थोडं शांत राहून दिस जातील. हा मंत्र डोळ्यासमोर आणला तर नक्कीच अविचारानं टाकणार्‍या पावलाला तो रोखेल आणि पुन्हा एकदा प्रयत्न तर करून पाहू ही आशावादाची मशाल आपल्याला हातात घेण्यासाठी प्रवृत्त करेल.
हा काळोख संपेल व नवविचारांचा सूर्योदय प्रत्येकाच्या मनात उगवेल. पुन्हा प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे ऋतू बहरतील. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. निसर्गाचं ऋतुचक्र जसं अविरत फिरत असतं तसंच माणसाच्या आयुष्यात येणारं सुखदुःखाचं ऋतुचक्र अविरत फिरत असतं. श्रावणात जसा ऊन पावसाचा लपंडाव चालू असतो तसाच सुखदुःखाचा लपंडाव मानवी आयुष्यात सतत चालू असतो. संघर्षावर मात करत जगणं हेच खरं जगणं असतं. आपल्याला सर्वांना शुक्रवारची बहीण भावाची कहाणी माहीत आहेच. सर्व संपत्ती लुबाडून बहिणीला हाकलून देणारा भाऊ…आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीशी लढा देत पुन्हा सन्मानानं जगणारी बहीण… या बहिणीनं आपल्या मनातील आशावादाची ज्योत शांत होऊ न देता तिला श्रमशक्तीनं पुन्हा प्रज्वलित केली.
दिस जातील… या मंत्राचा रियाज सतत चालू ठेवला.ज्या भावानं तिला घराच्या बाहेर काढलं त्याच भावानं परत आपल्या बहिणीला सन्मानानं घरात घेतलं. ती भावाला म्हणाली, दादा, कोणाचीच परिस्थिती कधीच सारखी राहत नाही. ती बदलत असते. फक्त काम करण्याची जिद्द हवी… म्हणूनच हे जीवन सुंदर आहे असं म्हणत पुढं पुढं जाणं म्हणजेच खरं जगणं असतं…
सिनेसृष्टीचा शहनशाह अमिताभ बच्चन याला तुझा चेहरा जरा आरशात पाहून ये, असं अनेक दिग्दर्शक म्हणाले. त्याला वारंवार अपमानित केलं गेलं. पण अमिताभने हार न मानता जिद्दीनं, मेहनतीनं, दमदार आवाजानं व अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अखिल सिनेसृष्टीचा तो शहेनशहा झाला… अनेक संशोधक, शास्त्रज्ञ असे आहेत की, त्यांना प्रत्येक प्रयत्नात अपयश आलं.पण त्यांनी आशावाद सोडला नाही. परत परत प्रयत्न करून त्यांनी आपलं संशोधन पूर्णत्वास नेलं… नवनवीन संशोधनात यश प्राप्त करून नावलौकिकास ते पात्र ठरले. स्वतःला प्रत्येक क्षेत्रात आशावादाची मशाल हाती घेऊन सिद्ध करून दाखविलं.
सद्गुरू वामनराव पै म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार… आपण कुठल्याही गोष्टीत हार न मानता जिद्दीनं प्रयत्न करत जीवनातील अडथळ्यांवर मात करत आपल्या आयुष्याचं लेणं घडवलं पाहिजे. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा असं म्हणत स्वतःला सावरत पुन्हा नवीन आयुष्याला सुरुवात केली पाहिजे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात…
मनमें जीत हमेशा होनी चाहिये…
नसीब बदलें या ना बदलें
वक्त जरूर बदलता है… म्हणूनच ’हे दिवस फार काळ राहणार नाहीत. लवकरच चांगले दिवस येतील, असं म्हणत मार्गक्रमणा चालू ठेवली पाहिजे.’ जेव्हा सूर्यासारखं चमकावं वाटतं तेव्हा सूर्यासारखं तळपणं सहन करावं लागतं.
कधीकधी जवळचीच माणसं विश्वासघात करतात… कधी कधी व्यवसायात अपयश येतं. प्रचंड कर्जबाजारी होण्याची वेळ येते… मन निराश होतं… आता सगळ्या वाटा बंद झाल्या असं वाटू लागतं…. अशावेळी जीवन संपवावं वाटतं… तेव्हा आशेचा काजवा त्या निराशेच्या काळोखात प्रकाश दाखवतो…
’हे दिवस नक्की जातील’ या विचाराचा भोवतालच्या अंधारात किरण चमकतो आणि त्या क्षणी आपण
स्वतःला सावरतो. डोळ्यातील आसवं पुसत मनाची समजूत काढत पुन्हा उमदीनं उभ राहत म्हणतो, भोग सरंल, सुख येईल… कारण अंधारानंतर पहाट ही होणारच असते. आयुष्य आपल्याला धडे देत असतं.प्रत्येक धड्यातील शिकवण ही वेदनेतूनच जन्माला येते.
आपलं आयुष्यदेखील घड्याळाच्या काट्यांसारखं आहे. हे काटे कधी सुखाच्या आकड्यांवरून दुःखाच्या आकड्यांकडे तर कधी दुःखाकडून सुखाकडे धावत असतात. ते कुणासाठीही थांबत नाहीत. मनातील आशावाद हा दुःखावर मात करण्याची ताकद देतो. या आशावादाचा ध्वज हातात धरून जिद्दीनं पुढं जायचं असतं. मग पायाखाली निखारे असले तरीदेखील आपल्या जिद्दीनं, मेहनतीनं त्या निखार्‍यांची नक्कीच सुगंधी फुलं होतील.
आपल्या सर्वांचे आदर्श असे श्री प्रभू रामचंद्र! त्यांनादेखील वनवास भोगावा लागलाच ना! महाभारतातील दानशूर कर्णाला अपमानित जिणं जगावं लागलंच ना? पण सार्‍या हालअपेष्टा सहन करत, दुःख उगाळत न बसता, डोळ्यात भविष्याची स्वप्ने बघत ते पुढं-पुढं चालतच राहिले आणि आपल्या पराक्रमाने सर्वांना वंदनीय झाले. म्हणूनच सदैव माणसा पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे… असं म्हणत नव्या आशावादाच्या बासरीवर दिस जातील, दिस येतील… भोग सरंल, सुख येईल… ही धून वाजवून आपल्या जीवनाचं शिल्प घडवूया…
ये जीवन है.. इस जीवन का यही है,
यही है, रंग रूप… माझं आवडतं गाणं लागलंय..
चला आपण ऐकूया….

Days will come, days will go.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *