तरुणाच्या मारहाणीत प्रेयसीच्या चार वर्षीय बालकाचा मृत्यू

सिन्नर: प्रतिनिधी
चार वर्षीय बालकासह विवाहितेला घेऊन पळून आलेल्या तरुणाने रागाच्याभरात विवाहितेच्या चार वर्षीय बालकाला  बेदम मारहाण केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.6) गुळवंच शिवारात घडली. एमआयडीसी पोलिसांनी 24 तासात शोधमोहीम राबवत संशयित तरुणाचा मुसक्या वळल्या. गणेश उर्फ अमोल नाना माळी (20) रा. बोकडदरा ता. निफाड असे संशयित तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  निफाड तालुक्यातील बोकडदरा येथून संशयित गणेश उर्फ अमोल नाना माळी (20) याचे काही महिन्यांपूर्वी गावातील विवाहितेसोबत सूत जुळले.  गणेश माळी याने सदर दोन मुले असलेल्या विवाहितेला  बोकडदरा येथून पळून घऊन गेला. त्यानंतर गणेश माळी हा विवाहित प्रेयसीसह गुळवंच येथे आला.  गेल्या पंधरा दिवसापासून गुळवंच शिवारात एका शेतकर्‍याकडे कामाला होते.  कृष्णा नावाचा चार मुलगा त्यांच्या समवेत होता.  गुरुवारी सायंकाळी कामावरून परत आल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले.  कृष्णा याने उलटा शर्ट घातल्याची कुरापत काढून संशयित गणेश माळी याने रागाच्या भरात बालकाला काठीने मारहाण करीत ढकलून दिले. यात कृष्णाच्या डोक्याला मार लागला. थोड्यावेळाने त्यांनी कृष्णाला चहा पाजला. मात्र त्यास त्रास होऊ लागल्याने दोघांनी त्याला दुचाकीहून सिन्नरच्या एका खासगी बाल रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यास सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. या दोघांनी त्याला सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यावेळी  संशयित गणेश माळी हा घटनास्थळावरून पळून गेला.  डॉक्टरांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. बालकाच्या आईने  पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव निकम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड चे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितास पकडण्यासाठी  निफाड पोलीस स्टेशन,  बोकडदराचे पोलीस पाटील व सरपंच यांच्यासोबत संपर्क साधला. संशयिताच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक शामराव निकम, सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, हवालदार बापू महाजन, धनाजी जाधव, संजय बागुल, विनोद जाधव, काकड यांच्या पथकाने तपासकामी बोकडदरा येथे धाव घेतली. तथापि, संशयित गणेश माळी हा मिळून आला नाही. त्यानंतर संशयितीच्या आत्याने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर पोलिसांना संशयीत गणेश माळीचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी तातडीने दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आत्याच्या घरी धाव घेऊन संशयित आरोपी गणेश माळी याला ताब्यात घेतले.  याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *