भाविक, पुरोहित संघ संतप्त; गोदाकाठ भागात तणावाचे वातावरण
पुरोहित संघ पोलिस ठाण्यात
मंत्री महाजन यांच्याकडून पाहणी
पोलिस यंत्रणा दाखल
नवीन मंदिर बांधण्याचे आश्वासन
पंचवटी : प्रतिनिधी
शहरात शुक्रवारी (दि.17) वस्त्रांतरगृह पाडण्याचे काम करीत असताना पुरातन दत्तमंदिरावर स्लॅबचा मलबा पडल्याने दत्तमंदिर त्याखाली दबले गेले. त्यामुळे पुरातन मंदिर पडल्याने भाविकांच्या भावना दुखावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी करीत मंदिर पडल्याबाबत चौकशी करण्याचे, तसेच मंदिर जसे आहे तसेच उभे करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
गेल्या शनिवारी (दि. 11) पाडकाम सुरू झाले आहे. वस्त्रांतरग्रहाचे पाडकाम करण्याअगोदर सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली होती. सर्व बाजूंनी पत्रे लावून हा भाग प्रतिबंधित करण्यात आला होता. वस्त्रांतरगृहाच्या खाली असलेले पुरोहित संघाचे छोटे दगडी पुरातन दत्तमंदिर याच्या सुरक्षेसाठी त्याच्याभोवती, तसेच वर माती-गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. वस्त्रांतरगृहाचा पुढील भाग पाडताना मंदिराच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले होते. मात्र, गुरुवारी मंदिर मलब्याखाली दबले गेल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. येथील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. ही घटना घडल्यानंतर येथे भाविकांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन या घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी या घटनेची चौकशी करण्यात येईल. हे काही जाणीवपूर्वक झालेले नाही. येथे मंदिर आहे, तसेच मंदिर उभे करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. महिलांना वस्त्रांतरासाठी शेड बांधण्यात येईल. दत्तमंदिर दबल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या असतील त्यामुळे त्यांनी माफीदेखील मागितली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सतीश शुक्ल, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी आदी उपस्थित होते.
येथील दत्तमंदिर पुरातन असून, त्याची व्यवस्था पुरोहित संघ बघत आहे. पूजनीय शंकर महाराज या मंदिरात आल्याचा उल्लेख आहे. हे मंदिर पडल्याने भाविकांच्या भावना दुखावणे साहजिक आहे. परंतु मंदिर बांधून देण्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
-चंद्रशेखर पंचाक्षरी, अध्यक्ष, पुरोहित संघवस्त्रांतरगृह पाडण्याचे काम करीत असताना येथील पुरातन दत्तमंदिर त्याखाली दबले गेले. हे काही जाणीवपूर्वक होणार नाही. याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचठिकाणी मंदिर उभे करण्यात येईल.
-गिरीश महाजन, जलसंपदामंत्री