धनत्रयोदशीने बाजारात चैतन्य; सोने-चांदीसह भांडी खरेदी

नाशिक ः प्रतिनिधी
दिवाळी सणातील धनत्रयोदशी आज (दि. 18) साजरी होत आहे. यादिवशी देवी लक्ष्मी, आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांचे पूजन केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. ग्राहक यादिवशी सोने, चांदी व भांडी खरेदी करतात. या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला धन, धणे यांची पूजा करण्यात येते. यादिवशी दान करण्याचे महत्त्व असल्याने वस्तू, कपडे व दान केले जाते.

तिमिराकडून तेजाकडे जाणार्‍या प्रकाशपर्वाला सुरुवात झाली असून, भगवान धन्वंतरीच्या पूजनाने मंगल आरोग्याचे दान मागण्यात येईल. त्यानंतर लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेचा सण साजरा करण्यात येईल. त्यासाठी सज्जता झाली असून, सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या आहेत.
वर्षभरातील महत्त्वाचा आणि आनंदाचा सण दिवाळी देशभर साजरी होत आहे. सणाचा उत्साह रस्त्यारस्त्यांवर दिसून येत आहे. लायटिंग, आकाशकंदील, रांगोळ्या, पणत्यांंनी सजलेले
अंगण, तसेच प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत. सराफ बाजार, भांडी बाजार आणि लक्ष्मीपूजनाचे पूजा साहित्य, झाडू, गृहोपयोगी वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. नवीन कपडे, नवीन वस्तू, फर्निचर, गृहसजावटीच्या वस्तू, पूजेचे साहित्य, वाहन, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदींसह बाजारपेठांत
रेलचेल दिसते. शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा व पंचवटी आदी ठिकाणी ग्राहकांनी रस्ते गजबजून गेले होते. कपडे, आकाशकंदील, पणत्या, लाह्या-बत्तासे, रांगोळी, विविध छाप आदींची खरेदी जोरदार होत असल्याचे दिसते. धनत्रयोदशीला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची
गर्दी होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *