मंदिरासाठी कोटींचा विकास आराखडा, दारणा धरणातून पाणीही आरक्षित!

अशोक खरात प्रकरणाने उडवली खळबळ; ‘सरकार पुरस्कृत बाबा?’ असा सवाल

सिन्नर : प्रतिनिधी
मिरगाव (ता. सिन्नर) येथील श्री सिद्धक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थान आणि स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्याभोवतीचे वाद आता अधिकच गडद होत आहेत. मंदिरासाठी पर्यटन विभागाने तब्बल एक कोटी पाच लाखांचा विकास आराखडा मंजूर केल्याचे समोर आले आहे. यापूर्वी दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी आरक्षित केल्याचा शासननिर्णयही समोर आल्याने या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पर्यटन विभागाने 31 मार्च 2018 रोजी तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यकाळात या विकास आराखड्याचा शासननिर्णय काढला होता. या आराखड्यातून 25 लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात वितरितही करण्यात आल्याची माहिती उपलब्ध कागदपत्रांमधून स्पष्ट झाली आहे.
या निधीतून सभामंडप, भक्तनिवास, चेंजिंग रूम तसेच इतर मूलभूत सुविधा उभारण्याचे काम प्रस्तावित होते. आराखड्यानुसार सभामंडपासाठी 36.20 लाख रुपये, भक्तनिवासासाठी 12.53 लाख रुपये आणि चेंजिंग रूमसाठी 13.36 लाख रुपये खर्चाचा अंदाज होता. याशिवाय परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, पार्किंग, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंगची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचे आदेश देण्यात आले होते. या घडामोडींमुळे खरातचा मंत्रालयातील प्रभाव किती मोठा होता, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्याला विरोध करणार्‍यांना दबाव, धमक्या आणि फोन कॉल्स येत असल्याच्या घटनाही समोर आल्याचे बोलले जात आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या प्रभावशाली व्यक्तींमुळे त्याला संरक्षण मिळत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्यावरून संताप

या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खरात आणि त्याच्या कथित सिंडिकेटवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी वळवण्यात आल्याचा आरोप होत असल्याने संताप वाढला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

Development plan worth crores for the temple, water also reserved from Darna Dam!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *