देवगावला दीर-भावजयचे एकाच विहिरीत मृतदेह घातपात की आत्महत्या? पोलिसांकडून शोध सुरू

लासलगाव :वार्ताहर
देवगावला विहिरीमध्ये दीर भावजयचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच विहिरीत दोघांचेही मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
देवगाव शिवारातील पोटे वस्तीनजीक मंगळवारी सकाळी पायल रमेश पोटे (19) या महिलेचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत देवगावचे पोलीसपाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी लहानू धोक्रट, संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.विहिरीजवळ जमलेल्या उपस्थितांनी मृत महिलेचे वाघलगाव (ता. वैजापूर) येथील नातेवाईक येईपर्यंत मृतदेह काढण्यास विरोध केला. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह काढण्यात आल्यानंतर नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश करत संताप व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अधिक कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर त्याच विहिरीत पुरुषाच्या चप्पला तरंगत असल्याचे पाहुन विहिरीत आणखी शोध घेण्यासाठी पाण्याचा उपसा करण्यता आला असता या महिलेचा दीर संदीप एकनाथ पोटे (27) यांचा मृतदेह गाळात रुतलेल्या अवस्थेत होता. त्यांचाही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृत महिला पायल हिला सहा महिन्याची मुलगी असून, मायेचे छत्र हरपल्याने उपस्थित हळहळ व्यक्त करीत होते. तर एकाच विहिरीत आढळलेल्या मृतदेहांमुळे गावात तर्क वितर्क लढविले जात असून, पोलिस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. या दीर-भावजयीच्या आत्महत्येने देवगावात शोककळा पसरली आहे.

चिमुकलीचे हरपले छत्र
देवगाव येथे विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या पायल या विवाहितेला सहा महिन्याची मुलगी आहे. आईच्या अकाली मृत्यूने तिचे मायेचे छत्रच हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दुसर्‍या घटनेत देवगाव परिसरातील कासली शिवारात मंगळवारी दुपारी एका विहिरीनजीक मोटारसायकल, मोबाइल, चपला आढळून आल्या. विहिरीच्या पाण्याचा उपसा केला असता प्रणीत दत्तात्रय बोचरे (22) याचा मृतदेह आढळून आला. लासलगाव पोलीस स्टेशनला याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित घटना आत्महत्या की घातपात, याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *