गेले बारा दिवस सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा जागतिक तिसरे महायुद्ध छेडले जाईल ही भीती आता फोल ठरल्यात जमा आहे. 13 जूनला इस्रायलने इराणवर हल्ले केल्यावर गेले 12 दिवस दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्रे डागून अक्षरशः तुटून पडले होते. तेल अवीवपासून तेहरानपर्यंत रोज प्रचंड हानी होत होती. या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्याने चीन, रशियासह अनेक राष्ट्रांनी या भूमिकेला विरोध केला होता. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे जग पुन्हा तिसर्या महायुद्धाच्या खाईत लोटले जाते की काय, अशी भीती निर्माण होत हाती. तिसर्या युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण खवळला होता. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची केवळ भाषाच न करता कतार, सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाईतळांवर इराणने क्षेपणास्र हल्लेही केले. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत ज्याप्रमाणे पाकिस्तानमधील अतिरेकी तळांंवर व त्यानंतर पाकिस्तानच्या रडार यंत्रणेवर हल्ले केले त्याचप्रमाणे या दोन्ही देशांतील युद्ध शिगेला पोहोचले होते; परंतु अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर या दोन्ही देशांनी अचानक युद्धबंदीची घोषणा केली आहे. अर्थात, या दोन्ही देशांतर्फे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच ही घोषणा केली आहे. या घोषणेनंतरदेखील दोन्ही देशांनी शस्त्र्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प यांचा पारा चढलेला दिसला. ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर केली असताना दोन्ही राष्ट्रांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्र डागणे सुरूच होते. त्यामुळे ट्रम्प यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. नाटो शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी निघालेले ट्रम्प यांनी यावेळी इस्त्रायलच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पण यावेळी त्यांनी इराणऐवजी इस्त्रायलवर नाराजी व्यक्त केली. शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इस्रायलने मोठे हल्ले करायला नको होते, असे ट्रम्प म्हणाले. कतार व अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतल्याचे समजते. अमेरिकेच्या हवाईतळांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इराणने कतारमार्फत व्हाइट हाउसला शांती संदेश पाठवला. त्यानंतर अमेरिकेने कोणतीही कारवाई न करण्याचे मान्य करत युद्धबंदीची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रेयवादातून युद्धबंदीची घोषणा केली असली, तरी हे युद्ध थांबवण्यामध्ये सर्वांत मोठी भूमिका कतारची ठरली आहे. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी अमेरिकेतर्फे प्रस्तावित केलेल्या युद्धविरामासाठी इराणला तयार केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी कतारच्या अमीर यांच्याशी संपर्क साधून त्यांना इस्रायल-इराणमध्ये मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार कतारच्या अमिरांंनी इराणच्या सर्वोच्च नेत्याशी संपर्क साधून प्रस्तावित युद्धविरामासाठी त्यांची सहमती मिळवली. विशेष म्हणजे, इराण-इस्रायलच्या या युद्धाची झळ कतारलादेखील सोसावी लागली आहे. इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदीद एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याने त्यांना आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची वेळ आली होती. या युद्धात सुरुवातीपासून अमेरिकेची भूमिका ही इस्रायलच्या बाजूनेच होती. अमेरिकेने या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इराणने अमेरिकेवर प्रत्यक्षात हल्ला केला नसला, तरी कतार, सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाईतळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ले केले. आंतरराष्ट्रीय दबाव व प्रत्यक्ष युद्धाची छळ पोहोचल्याने अमेरिकेने कतारमार्फत मध्यस्थी करत ही युद्धबंदी घडवून आणल्याचे बोलले जात आहे; परंतु या युद्धबंदीचे श्रेय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकटेच घेऊ पाहत आहेत. जो कित्ता ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत गिरवला तोच कित्ता आता ते इराण-इस्रायल युद्धबंदीबाबत गिरवताना दिसत आहेत. ट्रम्प प्रत्येक गोष्ट श्रेेयवादाशी जोडताना दिसत आहेत. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी उशिराने का होईना कबूल केल्याप्रमाणे भारताने त्यांच्या दोन प्रमुख हवाईतळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्ताननेच युद्धबंदीची विनंती केली होती. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने रावळपिंडी आणि पंजाब प्रांतातील नूर खान आणि शोरकोट हवाईतळांवर हल्ला केला.
त्यानंतर 45 मिनिटांतच सौदी प्रिन्स फैसल यांनी फोन करून दोन्ही देशांत युद्धबंदीसाठी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती.
त्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी 10 मे रोजी युद्धबंदीची घोषणा केली होती; परंतु या गोष्टीचे श्रेेय लाटण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून झाल्याचे दिसते. विरोधी पक्षदेखील ट्रम्प यांच्या दबावामुळेच भारताने युद्धबंदीची घोषणा केल्याचा आरोप वारंवार करताना दिसत आहे, पण याबाबत पाकिस्तान नवनवीन खुलासे करताना दिसत असल्याने मोदी सरकारला बहुतेक याबाबत खुलासे करण्याची गरज वाटत नसावी. भारत-पाकिस्तान युद्धानंतर अमेरिका-पाकिस्तान यांच्यात सलगी वाढल्याचे दिसत असले, तरी या युद्धात राजनैतिक विजय हा भारतानेच मिळवला आहे, हे ट्रम्प यांनादेखील मान्य करावे लागेल. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवणाचे आमंत्रण दिले असावे. इराण-इस्रायल युद्धात ट्रम्प यांनी सुरुवातीला इस्रायलची बाजू घेतली; परंतु युद्धबंदीनंतर इराणने शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप केला जात असताना ट्रम्प यांनी जर इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असले, तरी इस्रायलनेदेखील शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मी इस्रायलवर खूश नाही, असे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी श्रेेयवादातून हा राजकीय गोंधळ सुरू ठेवला आहे. युद्धाची झळ अमेरिकेला बसू लागल्याने ट्रम्प यांनी वेळीच हे युद्ध थांबविण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. कारण यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना देशांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला असता.
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…
अन्नविषबाधा ः दूषित अन्न खाल्ल्यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी आदी त्रास होतो. जुलाब व डायरिया ः…
वसाच्या सरी आणि रिमझिम फुहारांनी प्रत्येकाचे मन मोहरून जाते. काळ्याकुट्ट ढगांमधून झरझरत बरसणार्या पावसाच्या थेंबांमध्ये…