आहार की औषध व्हिटॅमिन बी 12

व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे. त्यामुळे ते शरीरात लगेच शोषले जाते. कोबाल्ट हे मिनरल व्हिटॅमिन बी 12मध्ये आहे. व्हिटॅमिन बी 12ची शरीराला अतिशय कमी प्रमाणात गरज असते. त्याचा यकृतामध्ये साठा असतो. हा साठा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत व्हिटॅमिन बी 12ची कमतरता निर्माण होण्याची शक्यता होत नाही. आपला आहार समतोल असेल, म्हणजे सगळे घटक आहारातून आपल्या शरीराला मिळत असतील तर व्हिटॅमिन बी 12ची कमतरता सहसा होत नाही. व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर आरोग्याची हेळसांड होत आहे, असे समजावे. बदललेली जीवनशैली हे व्हिटॅमिन बी12ची कमतरता होण्याचे प्रमुख कारण आहे.

व्हिटॅमिन बी 12 चे स्त्रोत – दूध, दही, ताक, प्राणीजन्य पदार्थ, मासे, अंडी, चिकन.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतेची कारणे –
अपचन संस्था कमकुवत असेल तर बी 12 शोषले जात नाही.
ज्यामुळे कमतरता निर्माण होऊ शकते.

पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तरी कमतरता निर्माण होऊ शकते.
पोटातले ऍसिडचे प्रमाण कमी असणे – चुकीच्या जीवनशैलीमुळे पित्ताचा त्रास होतो. मग ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या जातात. या गोळ्यांमुळे पोटातले ऍसिडचे प्रमाण कमी होते. मग बी 12 शोषण्यात अवरोध निर्माण होतो आणि कालांतराने बी 12 ची कमतरता होते.

व्हिटॅमिन बी 12कमतरतेची लक्षणे
भूक न लागणे, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, हातापायाला मुंग्या येणे ही लक्षणे असतील तर डॉक्टर तपासणी करायला सांगतात. गरज असेल तर पूरक औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन बी12ची पातळी खूप कमी असेल तसेच कमतरतेची लक्षणे असतील तरच औषध सुचविले जाते. जर व्हिटॅमिन बी12आतडी नीट शोषून घेऊ शकत नसतील तर इंजेक्शन हा महत्त्वाचा उपाय आहे.
– डॉ. प्रणिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *