10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचणार कृषी ज्ञान
सिन्नर : प्रतिनिधी
शेतात राबणार्या महिलांना आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळणार असून, शासनाच्या ‘महाविस्तार एआय’ या अॅपच्या माध्यमातून अधिकृत व अद्ययावत कृषी माहिती थेट त्यांच्या हातात पोहोचणार आहे. या अॅपच्या प्रभावी प्रचारासाठी सिन्नरसह संपूर्ण जिल्ह्यात 10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, जमिनीची मालकी असो वा नसो, शेती किंवा शेतीपूरक कामात सक्रिय असलेली प्रत्येक महिला ‘शेतकरी’ म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. स्मार्टफोन नसलेल्या महिलांसाठी गटाधारित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व सामूहिक मार्गदर्शन देण्यात येणार असून, तांत्रिक साधनांच्या अभावामुळे कोणतीही महिला माहितीपासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी ताई, कृषी सखी, पशू सखी, महिला बचत गट तसेच स्थानिक महिला संघटनांचा सहभाग घेतला जाणार आहे. महिलांच्या दैनंदिन कामकाजाचा विचार करून त्यांच्या सोयीनुसार बैठका व प्रशिक्षणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. ‘महाविस्तार अख’ अॅपमधील चॅटबॉटचा वापर, पीक सल्ला व शासकीय योजनांची माहिती कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणारे छोटे व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे
यांनी दिली.
मोहिमेवर प्रशासनाचे लक्ष
सर्व तालुका कृषी अधिकार्यांना सूक्ष्म नियोजन करून क्षेत्रीय कर्मचार्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी या मोहिमेचे संनियंत्रण करणार असून, मोहीम पूर्ण झाल्यानंतर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आणि साध्य झालेल्या व्याप्तीचा संक्षिप्त अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करावा लागणार आहे.
तरुण स्वयंसेवकांची फळी
कृषी विस्तार कार्याला गती देण्यासाठी कृषी, विज्ञान व ग्रामीण विकास शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत स्वयंसेवक म्हणून घेतली जाणार आहे. तसेच ‘पाणी फाउंडेशन’अंतर्गत कार्यरत प्रशिक्षणार्थ्यांनाही या मोहिमेत सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातून गावोगावी अॅप डाउनलोड व मार्गदर्शनाची मोहीम राबवली जाणार आहे.
Digital farming in the hands of women farmers; ‘Mahavistar AI’ campaign launched