10 रुपयांच्या बाजार फीऐवजी 70 रुपयांची वसुली; 5 मार्चला नगरपालिकेसमोर उपोषण
सिन्नर : प्रतिनिधी
पहाटेपासून शेतात राबून पिकवलेला भाजीपाला विकण्यासाठी सिन्नर बाजारात येणार्या पंचक्रोशीतील शेतकर्यांना येथे दिलासा मिळण्याऐवजी अपमान, दमदाटी आणि जादा वसुलीला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेने निश्चित केलेल्या केवळ 10 रुपयांच्या बाजार फीऐवजी थेट 50 ते 70 रुपये आकारले जात असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला असून, या अन्यायाविरोधात 5 मार्च रोजी सिन्नर नगरपालिकेसमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी वडगाव सिन्नर सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र चव्हाणके आणि सामाजिक कार्यकर्ते संजोग नाईक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.6) मुख्याधिकार्यांकडे तक्रार अर्ज दिला. उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ यांनी शेतकर्यांचे निवेदन स्वीकारले.
शेतकर्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, भाजीपाला विक्रीसाठी दररोज बाजारात येणार्या शेतकर्यांना ठेकेदार प्रशांत विजय गरगटे व त्यांचे कामगार दमदाटी करीत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. पैसे कमी दिल्यास कॅरेट व वाहनाची चावी काढून घेण्यासारखे प्रकारही घडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या सुलतानी वसुलीमुळे सिन्नर बाजारातून अनेक व्यापार्यांनी माघार घेतली आहे. नाशिकरोड, कॅम्प, भगूर, टाकेद परिसरातील व्यापारी कमी झाल्याने दुपारच्या वेळेत 20 ते 25 गाड्या बाजारात येत नाहीत. याचा थेट परिणाम शेतकर्यांच्या उत्पन्नावर होत असून, अनेकांना कमी दरात माल विकावा लागत आहे, तर काहींना नाइलाजाने माल न विकताच परत जावे लागत आहे. यावेळी राजेंद्र चव्हाणके, संजोग नाईक, रावसाहेब सांगळे, राजाराम कोटकर, कैलास सांगळे, ज्ञानेश्वर सांगळे, नितीन काळे, अण्णा कोटकर, रवींद्र उगले, अंकुश बुरकुल, ज्ञानेश्वर कडभाने, दीपक सोनवणे, देवीदास कातकाडे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय शिंदे, अनिल थोरात, मनोज चव्हाणके, रामदास वाजे, बाळासाहेब म्हस्के, भाऊसाहेब शिंदे, सुभाष आढाव, पंढरीनाथ शिंदे, मोहन सांगळे, मोहन शिंदे आदी उपस्थित होते.
दरपत्रक वेगळे, वसुली वेगळी
नगरपालिकेने प्रति गोणी, प्रति कॅरेट व प्रति शेकडा भाजीपाला यासाठी 10 रुपये बाजार फी निश्चित केली आहे. चारचाकी वाहन व बैलगाडीसाठी 100 रुपये दर आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्यांकडून 50 ते 70 रुपये बाजार फी, तर वाहनांसाठी 250 ते 300 रुपये घेतले जात असल्याने शेतकर्यांचा संताप वाढत आहे.
एकाच मालाला तीन पावत्या, शेतकरी मेटाकुटीला
चौदा चौक वाडा, नाशिक वेस आणि गंगावेस येथे एकाच मालासाठी प्रत्येकी 20 रुपये पावती घेण्याची सक्ती केली जात असल्याने किरकोळ विक्रेतेही अडचणीत सापडले आहेत. बाजारातील हा गोंधळ प्रशासनाच्या नजरेसमोर सुरू असल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली.
जादा वसुलीच्या पावत्यांनी वास्तव उघड
फ्लॉवर, कोबी, कांदे, बटाटे यासाठी गोणीमागे 20 ते 30 रुपये, कधी थेट 50 ते 70 रुपये, तसेच प्रति शेकडा भाजीसाठी 50 रुपये आकारले जात असल्याचा आरोप आहे. शेतमाल भरून आणलेल्या पिकअप व ट्रॅक्टर-ट्रॉली वाहनांकडून 300 ते 400 रुपये घेतले जात आहेत. अशा जादा रकमेच्या पावत्याच शेतकर्यांनी उपमुख्याधिकार्यांकडे सादर केल्या.
शेतकर्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. भाजीबाजारात अधिकृत दरपत्रक लावले जाईल. त्यापेक्षा जादा पैसे घेतल्यास रीतसर तक्रार करावी.
– दीपक बंगाळ, उपमुख्याधिकारी, नगरपरिषद, सिन्नर
Contractor’s greed in the vegetable market; Open looting of farmers!