पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन; मोबाइलवरून सायंकाळी 7.30 वाजता सहभाग
सिन्नर : प्रतिनिधी
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणपूरक उपाययोजना महत्त्वाच्या ठरत आहेत. या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील शेतकर्यांसाठी दि. 15 एप्रिल रोजी ‘डिजिटल शेतीशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी दिली.
या डिजिटल शेतीशाळेचे हे तिसरे सत्र असून, त्यामध्ये ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून पिकांचे संरक्षण कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
यावेळी कामगंध सापळ्यांचा वापर करून कीड नियंत्रण कसे करावे, शेतात पक्षी थांबे उभारण्याचे महत्त्व, मित्र कीटकांचे संवर्धन तसेच रसशोषक किडींवर नियंत्रणासाठी पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले
जाणार आहे. शेतकर्यांना या प्रशिक्षणासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नसून, मोबाइलच्या माध्यमातून आपल्या घरातूनच सायंकाळी 7.30 वाजता या सत्रात सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ, महिला बचतगट तसेच कृषीताईंनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या शेतीशाळेत सहभागी होता येणार असून, अधिक माहितीसाठी गावच्या सहाय्यक कृषी अधिकार्यांशी संपर्क साधावा किंवा संबंधित क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असेही कृषी विभागाने कळविले आहे.
‘Digital Farming School’ for Sinnar farmers on April 15