आली दिवाळी…

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या लोकांनाही आकर्षण असते. दारासमोरील मनमोहक रांगोळी, मिणमिणत्या पणत्यांचा उजेड, आकाशकंदिलांचा प्रकाश, विद्युत रोषणाई, रंगरंगोटी, तोरण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणातील उल्हास आणि उत्साहाने भारलेला दिवाळीचा सण प्रेम, मैत्री आणि मानवतेचा प्रकाशमय संदेश देणारा आहे. आपापल्या कुवतीनुसार हा सण लोक साजरा करतात आणि जगाच्या पाठीवर भारतीय कोठेही असले, तरी ते हा सण साजरा करतात. यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट असून, ती महागाईत आली आहे. एल निनोमुळे यंदा भारतात पाऊस कमी पडला, ज्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दुष्काळ पडला असून, इतर राज्यांतही दुष्काळसदृश स्थिती आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या हातात पिके व पैसा आला नाही. शेतीतील जीवनावश्यक खाद्यवस्तूंचे उत्पादन कमी आल्याने, तसेच मूग, कडधान्ये, सोयाबीनसह तेलबिया, भात, ज्वारी, बाजरी आणि मका इत्यादी शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारात टंचाई निर्माण होऊन वस्तूंचे भाव वाढले आणि महागाईत भर पडली. दिवाळीच्या आधीच साखरेचे भाव वाढले, खोबरे व ड्रायफ्रूट्स महागले. अमेरिका-इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्याने पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्याने महागाईचा भडका आणखी वाढला आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदावली. त्यातच रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत वाढल्याने भारताचे आयात बिल वाढले, इंधन व खाद्यतेल यांचे भाव वाढल्याने महागाई वाढली. दुष्काळ आणि भडकत्या महागाईत दिवाळी आली असली, तरी लोक आपापल्या कुवतीने दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत. मराठी माणसांचा विचार करता ’आली माझ्या घरी ही दिवाळी’ या गाण्याच्या ओळी सहज ओठांवर येतात. दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. अमावस्येच्या रात्री अंधारावर विजय मिळविण्यासाठी अंगण आणि परिसर प्रकाशमय करण्याची परंपरा असून, दिवे लावून अंधारावर विजय मिळवला जातो. या दिवशी माता लक्ष्मीदेवी पर्यटनासाठी बाहेर पडतात आणि भक्तांसोबत आनंद सामायिक करतात. देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, तसेच भगवान गणेश, सरस्वती आणि भगवान कुबेर यांचेही पूजन होते. वर्षभर घरातील केरसुणीचा वापर कचरा भरण्यासाठी करत असल्यामुळे तिची हळद-कुंकू आणि झेंडूची फुले वाहून पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी घरात येते आणि तिने कायमस्वरूपी वास्तव्य करावे म्हणून घरातील सर्वजण प्रार्थना करतात. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात असल्याने सोने-चांदी व नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळी साजरी करण्यामागे कोणतेही कारण असले, तरी बाजारात यानिमित्त उत्साहाचे वातावरण असते. चार-पाच दिवस चालणार्‍या या उत्सवात लक्ष्मीपूजन हाच सर्वांत महत्त्वाचा दिवस असतो आणि यालाच दिवाळी म्हणतात. देवदेवतांची पूजा करून त्यांना घरात वास करण्यासाठी आमंत्रित केले जाते. दुष्काळ व महागाई असली, तरी दिवाळीचे महत्त्व कमी होत नाही. दिवाळी म्हणजे पाहुणे हे समीकरण ठरलेले असून, कोणी ना कोणी दिवाळीला घरी येतेच. सहवास, सहभाग आणि सहयोग यांचा मेळ म्हणजेच दिवाळी होय. नात्यांच्या उत्सवामुळे मंतरलेले दिवस म्हणजे खर्‍या अर्थाने महिलांची दिवाळी होय आणि भाऊबीज हा त्यांचा आवडता दिवस असतो. यानिमित्ताने माहेरी जाण्याची संधी महिलांना व विशेषतः ग्रामीण भागातील सासुरवाशिणींना मिळत असते. काही महिलांसाठी वर्षातून एकदाच माहेरी जाण्याचे निमित्त म्हणजे दिवाळी असते. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन आदर-सन्मान राखत तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. त्याआधी येणारा पाडवा किंवा बलिप्रतिपदा या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते आणि याच दिवसापासून नवीन विक्रम संवत या वर्षाची सुरुवात होते. कालनिर्णय पंचांगानुसार, गुरुवार, दिनांक 5 नोव्हेंबर रोजी गोवत्स द्वादशी अर्थात, वसूबारस व रमा एकादशीपासून यंदाची दिवाळी सुरू होत आहे. शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी व धन्वंतरी जयंती आहे. शनिवार, 7 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी तथा छोटी दिवाळी आहे. रविवार, 8 नोव्हेंबर रोजी दर्श अमावस्या असून, याच दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे, हाच दिवाळीचा खरा मुख्य दिवस आहे. सोमवार, 9 नोव्हेंबर व मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा (पाडवा) व कार्तिक मासारंभ आहे. याच दिवशी संवत 2083 सुरू होत आहे. बुधवारी, 11 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. प्रतिकूल परिस्थितीतही दिवाळी साजरी करायची या उद्देशाने काटकसर करून खरेदी करण्याकडे कल असतो. दिवाळीनिमित्त बाजारात गर्दी होत असते आणि लक्ष्मीपूजन होईपर्यंत ही गर्दी कायम राहते. आपल्या कुवतीनुसार कपडे, दागिने व वस्तू खरेदीसाठी लोकांची धावपळ सुरू असते. पणत्या, आकाशकंदील व विद्युत रोषणाई खरेदी करण्याची लगबग सुरू असते. लक्ष्मीपूजनासाठी झाडू, लाह्या, बत्तासे, लक्ष्मी-कुबेराच्या मूर्ती, पाट आणि देवाचे लाल कापड इत्यादी वस्तू खरेदी करण्याकडे लक्ष दिले जाते. लक्ष्मीपूजन म्हणजेच खरी दिवाळी असून, घरी फराळ करण्यासाठी महिलांची धावपळ दिसते आणि अलीकडे रेडीमेड फराळाला पसंती दिली जात आहे. दिवाळीचा मुख्य दिवस कार्तिकी अमावस्येचा असल्याने दीपोत्सव साजरा केला जातो. रात्री अमावस्या असल्याने सर्वत्र अंधार असतो आणि दिवे लावून या अंधारावर विजय मिळवला जातो. या दिवशी माता लक्ष्मीदेवी पर्यटनासाठी बाहेर पडतात आणि भक्तांसोबत आनंद सामायिक करतात. देवी लक्ष्मी, गणेश, सरस्वती आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. वर्षभर वापरल्या जाणार्‍या केरसुणीची हळद, कुंकू व झेंडूची फुले वाहून पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि कायमस्वरूपी राहावी म्हणून प्रार्थना केली जाते. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. उत्सवप्रिय भारताची ओळख जगाला करून देणारा दीपावलीचा सण केवळ भारतच नाही, तर जगाच्या कानाकोपर्‍यांमध्ये साजरा केला जातो. राजा असो अथवा रंक, प्रत्येक जण आपापल्या परीने या सणाचे स्वागत करतो. भारतासारख्या बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुजातीय आणि बहुधार्मिक देशामध्ये दीपावलीच्या कालावधीत एखाद्या झोपडीबाहेरही आकाशकंदील दिसतो आणि अब्जावधींची उलाढाल करणार्‍या उद्योगपतीच्या बंगल्याबाहेरही आकाशकंदील दिवाळीचे स्वागत करत असतो. भारतीय कुटुंबव्यवस्था मजबूत करण्याचे काम हे सण करत असतात म्हणूनच पूर्ण कुटुंब एकत्र येऊन असे सण साजरे करते. पती-पत्नीच्या प्रेमाची वीण घट्ट करणारा दिवाळी पाडवा असो, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणारी भाऊबीज असो किंवा लक्ष्मीची आराधना करणारा लक्ष्मीपूजन सण असो, या सर्व सणांमध्ये कुटुंब हा घटक समान असल्यामुळे कुटुंबव्यवस्था मजबूत करण्याचे काम केले जाते. वर्षानुवर्षे प्रकाशोत्सवाचा सण अशाच प्रकारे साजरा केला जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या सणाला आधुनिकतेचा साज चढला असला, तरी परंपरा कायम ठेवूनच हा सण साजरा करण्याकडे भारतीयांचा कल आहे. समस्या आणि अडचणी कितीही असल्या तरी सण गोड करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदाही दिसत आहे.

Diwali has arrived…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *