महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड

23 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर; गेल्या वर्षीपेक्षा साडेतीन हजारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका कर्मचार्‍यांना प्रशासनाने सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. त्याचा पाच हजार कर्मचार्‍यांना फायदा होईल. सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल एस-17 व त्यापेक्षा कमी वेतन स्तरात वेतन घेणारे मनपा कर्मचारी, तसेच अंगणवाडीसेविका, मदतनीस, रोजंदारी/मानधनावरील कर्मचारी, सफाई कर्मचारी, बूस्टर पंपिंग कर्मचारी आणि शिक्षण विभागातील कर्मचारी यांना 23 हजार 500 रुपये एवढेसानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यात गेल्या वर्षीपेक्षा साडेतीन हजारांची वाढ केली आहे.
नाशिक महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मंजूर केले जाते. यंदाही सानुग्रह मिळणार मात्र, कधी, याकडे कर्मचार्‍यांचे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी (दि. 10) प्रशासनाने सानुग्रह अनुदान मंजूर करताच कर्मचार्‍यांत आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. शासनाकडून दिल्या जाणार्‍या अनुदानातून मानधन घेणारे व सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी मनपामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या 60 टक्के गटातील कर्मचार्‍यांंना 14 हजार 100 इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयासाठी मुख्य लेखाधिकार्‍यांनी अंदाजपत्रक ताळमेळाचा सखोल विचार करून संबंधित प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्याकडे सादर केला होता. आयुक्तांनी संबंधित प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सानुग्रह अनुदानास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळी अधिक आनंदी वातावरणात साजरी करण्यास मदत होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *