लासलगाव : समीर पठाण
नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी
एक तरी ओवी अनुभवावी….
ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची भलावण करताना म्हटले आहे की, एकतरी ओवीचा अनुभव घेतल्यास आयुष्याचे कल्याण होईल.माउलींनी गीता प्राकृत मध्ये रचली.सामान्य माणसासाठी संत ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीच्या रूपाने निरूपण केले. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण आपण ऐकले आहे, मात्र संपूर्ण ज्ञानेश्वरीच हस्तलिखित करण्याची किमया नैताळे येथील अक्षरमित्र मधुकर कोल्हे या अवलिया शेतकरी पुत्राने केली आहे.
संस्कृत भाषा आणि त्यातल्या त्यात ग्रंथ हस्तलिखित करणं एवढ सोपं नक्कीच नाही. ज्ञानेश्वरी काही सामान्य ग्रंथ नाही, प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं तेज या ग्रंथामध्ये आहे. ग्रंथ लिहिण्यासाठी अक्षरांशी एकरूप व्हावं लागतं. यात काना, मात्रा, वेलांटी, उकार यात काही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते, नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो मात्र हे अवघड शिवधनुष्य कोल्हे यांनी पेलले आहे. कोल्हे यांनी ज्ञानेश्वरीचे संपूर्ण 18 अध्यायातील गीतेचे 700 श्लोक व तब्बल 90033 ओव्या, पसायदान हस्तलिखित केले आहे त्यासाठी त्यांना मोठ्या वहीचे 800 पाने लागली आहेत.
कोल्हे लिहीण्यासाठी कधी 10 कधी 30 तर कधी 50 ओव्या रोज लिहायला सुरुवात केली. रात्री 11/12 वाजायचे. प्रथमदर्शनी हे काम सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात यातील किचकटपणा हा ग्रंथ पाहतांना लक्षात येतो. अतिशय क्लिष्ट अशी जोडाक्षरे लिहितांना चूक न होऊ देणे हे काम सोपे नाही,
त्यातुन चूक झाली तर खाडाखोड करण्यास वाव नाही असे असतानाही हे काम त्यांनी अत्यंत एकाग्रतेने पूर्ण केले. विशेष म्हणजे या ग्रंथात मुखपृष्ठा पासून मलपृष्ठा पर्यंत एकही अक्षर मुद्रित नाही. ज्ञानेश्वरीच्या मुखपृष्ठावर हस्तलिखित ज्ञानेश्वर माउली यांचे चित्र, आतील पानात सुरवातीला प्रस्तावना, संपूर्ण ओव्या व शेवटी पसायदान अशी रचना करण्यात आली आहे.
या हस्तलिखित ग्रंथाची विशेषता अशी आहे की यातील लेखन संपूर्ण ओळी खाली लिहिण्यात आले आहे. ग्रंथावरून नजर फिरवली असता अक्षर अत्यंत सुंदर व मोत्यासारखे काढले आहे.अखेर अत्यंत परिश्रम घेऊन कोल्हे यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिण्यात यश मिळवले व दि.10 एप्रिल रोजी ग्रंथ लिहून पूर्ण केला.
यावर.. माझिया सत्य वादाचे तप । वाचा केले बहुत कल्प माऊली म्हणता म्हणून मी संस्कृतमधील ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी मध्ये सांगू शकलो असे कोल्हे यांनी गावकर्यांसमोर पत्रकारांशी बोलतांना अभिमानाने सांगितले.