नाशिक

सात दशकांपासून दररोज भुकेल्या जीवांना अन्नदान; गाडगे महाराज धर्मशाळेचा अखंड उपक्रम

संत गाडगे महाराज जयंती विशेष

नाशिक : मुकुंद बाविस्कर
रंजल्या-गांजल्यांची आयुष्यभर सेवा करणारे व सर्वसामान्य गरीब माणसांत देव शोधणारे थोर पुरुष संत गाडगेबाबा होय. त्यांनी सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी म्हणजे 1932 मध्ये जुन्या नाशकात हनुमानगढीवर स्वतः बांधून सुरू केलेल्या धर्मशाळेत अन्नछत्राचे पुण्यकार्य आजही अखंडपणे घडत आहे. कालानुरूप या धर्मशाळेचे नामकरण गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट झाले, तरी वाढत्या महागाईच्या काळातही अनंत अडचणींवर मात करीत या ठिकाणी भुकेल्या जीवांना अन्नपाणी देण्याचा वसा आणि वारसा सात दशकांपासून सुरू आहे. दररोज दुपारी भुकेल्या जीवांना अन्न देण्याचा वसा व वारसा आजही सुरू आहेे, हे विशेष म्हणावे लागेल.
समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर कार्य करणारे थोर समाजसेवक संत गाडगे महाराज यांचा आणि नाशिक शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा ऋणानुबंध होता. सन 1925 च्या सुमारास पंढरपूर येथे धर्मशाळेचे काम गाडगेबाबांच्या देखरेखीखाली सुरू होतेे. या धर्मशाळेमुळे पंढरपूरला येणार्‍या यात्रेकरूंची मोठी सोय होणार होती. ही वार्ता कानी पडताच नाशिकमधील काही जाणकार व पंचमंडळी पंढरपूरला जाऊन गाडगेबाबांना भेटली. पंढरपूरप्रमाणेच नाशिकदेखील मोठे तीर्थस्थळ असल्याने येथे येणार्‍या गोरगरीब यात्रेकरूंच्या राहण्या-खाण्याची सोय व्हावी यासाठी आपण पुढाकार घेऊन धर्मशाळा उभारावी, अशी विनंती या मंडळींनी बाबांना केली.
त्यानंतर 1928 मध्ये गाडगेबाबा नाशिक येथे आले असता, त्यांनी शहर परिसरात फिरून अनेक ठिकाणी जागा बघितल्या. अखेर त्यांना जुन्या नाशकातील हनुमानगढीची जागा पसंत पडली. कारण हा भाग नदीकाठी असल्याने पाण्याची सोय होती. धर्मशाळा तर उभारायची, पण हातात पैसा नव्हता. त्या काळात नाशिक शहर फार मोठे विस्तारलेले नव्हते. त्यामुळे धर्मशाळेसाठी इतकी मोठी रक्कम उभी राहणार नव्हती. विशेष म्हणजे, बाबांना केवळ एक-दोन श्रीमंत लोकांकडून देणगी घेऊन धर्मशाळा उभारायची नव्हती. त्यामुळे लोकांच्या उपयोगी येणारी वास्तू लोकांच्याच पैशातून व्हावी यासाठी त्यांनी राज्यातच नव्हे, तर परराज्यांत जाऊन दौरे करीत कीर्तनाच्या माध्यमातून आवाहन करत लोकवर्गणी उभारली आणि धर्मशाळेचे काम सुरू झाले. नाशिकमधील धर्मशाळेचे काम सुरू असताना संत गाडगेबाबांचा मुक्काम होता. बाबा स्वतःच धर्मशाळेची रचना कशी असावी याच्या सूचना देत असत. धर्मशाळेचे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून रात्री हातात कंदील घेऊन कामगारांना सपाटीकरण करायला लावत. एकदा तर बांधकामासाठी माती कमी पडली म्हणून सायंकाळी मजुरांनी काम थांबवले, तेव्हा बाबांनी रात्री कुदळ-फावडे हाती घेऊन गोदाकाठी मातीचा मोठा ढिगारा उभा केला. सन 1932 मध्ये बाबांच्या देखरेखीखाली धर्मशाळा उभी राहिली.
यासाठी काहींनी पैसे दिले, तर काहींनी श्रमदान केले. इमारतीला तीन लाख रुपये खर्च येऊन दोनशे खोल्या उभ्या राहिल्या. नाशकात थंडी, वारा, ऊन, पावसात येणार्‍या गोरगरीब यात्रेकरू तसेच भटके लोक, कुष्ठरोगी, अनाथ, आजारी लोक व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी हक्काचा निवारा उभा राहिला. राहण्याची सोय तर झाली; परंतु पोटापाण्याचे काय? म्हणून 1956 मध्ये बाबांनी अन्नछत्र सुरू केले. याठिकाणी रोज दुपारी 4 वाजता सुमारे 250 ते 300 लोकांच्या भोजनाची सोय करण्यात आली. या कामासाठी कायमस्वरूपी देणगीदारदेखील बाबांनी तयार केले. कोणताही गोरगरीब माणूस उपाशी झोपू नये, ही त्यामागची बाबांची भावना होती. कालानुरूप आता या धर्मशाळेचे नाव गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, असे करण्यात आले आहे.
याठिकाणी आजही संत गाडगेबाबांनी सुरू केलेली अन्नछत्राची परंपरा अजूनही सुरू आहे, अशी माहिती ट्रस्टचे कार्यकारी संचालक कुणाल देशमुख यांनी दिली. ट्रस्टतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. नाशिकमधील डॉक्टर व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने रोगनिदान शिबिर तसेच आदिवासी पाड्यांवर कपडेवाटप, धान्यवाटप, फराळवाटप असे कार्यक्रम घेण्यात येतात.

नाशिक नगरपालिकेत रंगले होते बाबांचे कीर्तन

मेन रोडवरील तत्कालीन नाशिक नगरपालिकेच्या इमारतीत 1936 मध्ये गाडगेबाबांचे कीर्तन रंगले होते. शिक्षणाचे संस्कार झाल्याशिवाय माणसाला मनुष्यत्व येत नाही, असे बाबांनी जनतेला पटवून दिले होते. त्याचप्रमाणे 1950 मध्ये नाशिकमध्ये राष्ट्रीय अधिवेशन भरले असता, ज्येष्ठ नेते शंकरराव देव, बाळासाहेब खेर यांनी गाडगेबाबांच्या धर्मशाळेला भेट दिली होती.

नाशिकमध्ये उपचारासाठी येणारे गोरगरीब लोक दवाखान्यात असतात; परंतु त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांची राहण्याची सोय नसते. म्हणून आम्ही त्यांची संत गाडगेबाबा धर्मशाळेत राहण्याची सोय करतो. वर्षभर अन्नदानासाठी देणगीदारांचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात याठिकाणी वृद्धाश्रम उभारण्याचा ट्रस्टचा विचार आहे.
– कुणाल देशमुख, कार्यकारी संचालक, गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

1 hour ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

1 hour ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

1 hour ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

1 hour ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

2 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

2 hours ago