आरोग्य प्रश्नी खा. राजाभाऊ वाजे संसदेत गरजले, इंग्रजीतून पाहिले भाषण
संदर्भ, सिव्हिल, इसआय रुग्णालयाबाबत मंत्र्यांना विचारणा, आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेकडेही वेधले लक्ष
सिन्नर :प्रतिनिधी
नवनियुक्त खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत नाशिक लोकसभेतील आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारला तिखट सवाल विचारले. आपले संसदेतील पाहिले भाषण थेट इंग्रजीतून करत त्यांनी विरोधकांना चपराक देखील लगावली आहे. संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, ई.एस.आय.सी. रुग्णालय यांच्या अवस्थेबाबत वाजे यांनी सवाल उपस्थित करत त्यात सुधारणेची मागणी केली. यासह आदिवासी भागात आरोग्य केंद्राच्या फक्त इमारती उभ्या आहेत. परंतु, डॉक्टर, कर्मचारी यांचा अभाव असल्याने आजही आदिवासी भाग आरोग्य सुविधांपासून वंचित असल्याचे यावेळी राजाभाऊ वाजे म्हणाले.
नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात केंद्र सरकारच्या एन. एच. एम. आणि एन.सी.डी. योजनेच्या अंतर्गत रुग्णांना लाभ मिळावा. तसेच, संदर्भ सेवा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासह, नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात देखील आगामी कुंभमेळा यासह अधिकचा भार या अनुषंगाने आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन लवकरात लवकर जिल्हा शासकीय रुग्णालय अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.सातपूर येथे असलेले कामगारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ई. एस.आय.सी. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आणि रुग्णांची होणारी हेळसांड याबाबत अनेक तक्रारी मागील काही काळात येत होत्या. नाशिकच्या तब्बल 2 ते 3 लाख कामगारांच्या एकूण 15 लाखाहून अधिक कुटुंबियांसाठी आरोग्य सुविधेसाठी आधार असलेलं हे रुग्णालय केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या निधीतून चालवण्यात येते. मात्र याच प्रशासनाबाबत मागील काही काळात अनेक तक्रारी असल्याने हे रुग्णालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून चालवण्यात यावे अशी मागणी खा. वाजे यांनी संसदेत केली.नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने आदिवासी बहुल भाग आहे. याठिकाणी अनेकदा आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या आदिवासी भागात आरोग्य विभागाच्या इमारती तर आहेत मात्र तिथे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी हे उपलब्ध नसल्याची वास्तविकता आहे. याच मुद्द्याकडे खा. राजाभाऊ वाजे यांनी संसदेत लक्ष वेधले.
इंग्रजीतून भाषण करत विरोधकांना चपराक
खा. राजाभाऊ वाजे यांना लोकसभा निवडणुक प्रचाराच्या विरोधकांनी त्यांच्या पेहरावावरून डिवचले होते. त्यांनी त्याला त्यावेळी कोणतेही विशेष उत्तर दिले नव्हते. मात्र, आपल्या संसदेतील पहिलेच भाषण थेट इंग्रजीतून करत त्यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे.