पराभूतांचे मनोगत
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता गमावावी लागली, तर उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी सर्व ताकद पणास लावूनही काँग्रेसला कमालीचे अपयश आले. काँग्रेसला या निवडणुकीत फारसे काही हाती लागणार नसल्याचे अंदाज आधीच देण्यात आले होते. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना आपला अमेठी मतदारसंघही राखता आला नव्हता. इतकी दयनीय अवस्था पाहून विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधातील उत्तर प्रदेशातील कोणताही पक्ष काँग्रेसजवळ जाण्यास तयार नव्हता. यापूर्वी युती केल्याचा अनुभव घेतल्याने काँग्रेसपासून चार हात दूर राहण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला होता. त्याचमुळे काँग्रेसने बहुजन समाज पार्टीशी युती करण्याचा प्रयत्न करुन मायावती यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याची तयारी काँग्रेसची होती,असे राहुल गांधी म्हणत आहेत. परंतु, मायावतींनी भाजपाला घाबरुन नकार दिला, असा आरोप त्यांनी दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना केला. नेहमीप्रमाणे स्वबळावर लढण्याचा नारा मायावतींनी आधीच दिला होता. त्यामुळे काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच नव्हता. बसपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची उत्तर प्रदेशात दयनीय अवस्था झाली. काँग्रेसला काँग्रेसला ४०३ पैकी केवळ दोन जागा आणि अडीच टक्क्यापेक्षा कमी मते मिळाली. दुसरीकडे बसपाला केवळ एक जागा आणि जवळपास १३ टक्के मते मिळाली. काँग्रेसच्या ९७ टक्के उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही, तर बसपाच्या ७२ टक्के उमेदवारांनी अनामत रक्कम गमावली. या दोन राष्ट्रीय पक्षांना सपशेल पराभव पत्करावा लागला. भाजपा पुन्हा सत्तेवर येण्यास मायावतीच जबाबदार असल्याचे राहुल गांधी यांना म्हणायचे आहे, असे त्यांच्या आरोपावरून दिसते. पराभूत झालेल्या पक्षाच्या पराभूत एका नेत्याने दुसर्या पराभूत पक्षाच्या नेत्याविषयी व्यक्त केलेले मनोगत आणि देण्यात आलेले उत्तर हेही एक मनोगतच आहे. काँग्रेसच्या दयनीय स्थितीला काँग्रेसच जबाबदार असून, बसपाच्या पीछेहाटीला बसपाच जबाबदार आहे. दोन्ही पक्षांनी युती केली असती, तरीही भाजपाचा पराभव झाला नसता कारण भाजपाला पर्याय म्हणून समाजवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेला होता. भाजपाच्या जागा कमी करण्यात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टीला यश मिळाले, हेच विधानसभा निवडणुकीतील एक वेगळे वैशिष्ट्य ठरले.
राहुल गांधींची टीका
काँग्रेससोबत आघाडी व्हावी, म्हणून मायावती यांना प्रस्ताव दिला होता. त्यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीही व्हावे, या मताचे आम्ही होतो. परंतु, केंद्र सरकार (भाजपा) सीबीआय, ईडी लावेल किंवा पेगाससची भीती दाखवेल, यामुळे त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. परिणामी मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी गमावली. कांशीराम यांनी रक्त आटवून अथक परिश्रमाने बहुजन समाज पार्टी मजबूत केली. परंतु, दुर्दैव असे आहे की, त्यांना (मायावती) निवडणूकही लढता येत नाही. असे राहुल गांधी म्हणाले. बसपा आणि काँग्रेस यांची युती झाली असती, तर भाजपाचा पराभव होऊन मायावती मुख्यमंत्री झाल्या असत्या, असा राहुल गांधी यांना म्हणायचे आहे. त्यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. युती होऊनही भाजपाचा पराभव होऊ शकला नसता. काँगेसला मिळालेली अडीच टक्के मते आणि बसपाची १३ टक्के मिळून साजेपंधरा टक्के मते होतात. एवढ्या मतांवर सत्ता कशी मिळाली असती? फार फार म्हणायचे झाले, तर दोन्ही पक्षांच्या जागा अगदी थोड्या वाढल्या असत्या. बसपाचा मुख्य आधार दलित मतदार हाच आहे. दलित समुदायाला काँग्रेसनेच न्याय दिला आहे, असाही दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांचा दावा खरा मानला, तर दलित समुदायाने काँग्रेसला भरभरुन मते का दिली नाहीत? हा प्रश्न आहेच. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे ‘गुंडाराज’ येऊ नये म्हणून दलित समाज भाजपाबरोबर गेल्याचा निष्कर्ष मायावती यांनी निवडणूक निकालानंतर काढला. मायावतींनी निवडणुकीत मनापासून प्रचार केला नाही. त्यामुळे दलित समुदायामध्ये संभ्रम निर्माण झाल्याने बसपाची हक्काची मते विखुरली गेली. पूर्ण ताकदीनिशी मायावती मैदानात उतरल्या असत्या, तर बसपाला एकाच जागेवर समाधान मानण्याची वेळ आली नसती. परंतु, त्यांनी हातानेच पक्षाची वाताहत करुन घेतली. ‘गुंडाराज’ नको म्हणून अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत झाली, असा अर्थ काढता येतो. एकदा निकाल लागल्यानंतर जर आणि तर काही महत्व राहत नाही.
मायावतींचे उत्तर
आपल्यावर झालेल्या टीकेला मायावती उत्तर देण्यात माहीर आहेत. त्यांनी राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि युती करण्याचा प्रस्तावही दिला नव्हता, असे स्पष्ट केले. बसपाची ताकद कांशीराम वाढवत होते, तेव्हा राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी बसपाचा द्वेष करत होते. आता राहुल गांधीही तेच करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मूळात उत्तर प्रदेशात दलित समाज आधी काँग्रेसबरोबर होता. बसपाचा उदय झाल्यानंतर दलितांनी काँग्रेसची साथ सोडण्यास सुरुवात केली. तेथेच उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या अधोगतीला सुरुवात झाली होती. त्याचमुळे राजीव गांधी बसपावर टीका करत होते. हे मायावती यांनी अचूकपणे सांगितले. काँग्रेसला जवळ करण्यास बरेच भाजपाविरोधी पक्ष राजी नाहीत. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल काँग्रेसपासून दूर गेला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी काँग्रेसला वगळून आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांचाही तसाच प्रयत्न आहे. कर्नाटकात जनता धर्मनिरपेक्ष काँग्रेसपासून दूरच आहे. आम आदमी पार्टीही काँग्रेसला विचारत नाही. अशा परिस्थितीत जी-२३ गटाच्या भूमिकेने या पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपले घर सांभाळावे, असा खोचक सल्ला मायावती यांनी राहुल गांधींना दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने सतत अवमान करत त्यांना भारतरत्न देण्याचे टाळले, हा तर मायावतींचा नेहमीचा आरोप आहे. कांशीराम यांनी काँग्रेसला हिरव्या गवतात लपलेला साप (सापनाथ), अशी उपमा दिली होती. ही एकूण परिस्थिती पाहिली, तर मायावती यांनी काँग्रेसला घर सांभाळण्याचा योग्य सल्ला दिला आहे. आपला पक्ष संधीसाधू आहे, अशी जाहीर कबुली कांशीराम यांनी दिली होती. त्याच दृष्टीने पाहिल्यास बसपाने आतापर्यंत दोनदा समाजवादी पार्टी, एकदा काँग्रेसशी युती केली होती. याशिवाय भाजपाच्या मदतीने मायावती यांनी दोनदा मुख्यमंत्रीपद मिळवून संधी साधली होती. एकदा समाजवादी पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळविले. हा इतिहास पाहता बसपाला कोणत्याही पक्षाची अॅलर्जी नाही. मात्र, कोणत्याही पक्षाची किंवा नेत्याची टीका बसपा सहन करत नसल्याने मायावतींनी उत्तर दिले आहे.