राज्यात नगरपरिषदा, नगरपंचायत निवडणुका पार पडल्या असून, काही निवडणुका बाकी आहेत. आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दि. 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता भाजपसह सर्व राजकीय पक्षांचे लक्ष महानगरपालिका निवडणुकीकडे लागले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे विशेष लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मोठ्या शक्तीने तयारीला लागलेला दिसत आहे. त्यासाठी भाजपाने मुंबईत अभ्यासू व ’आरे’ला ’कारे’चे निडर उत्तर देणारा आक्रमक चेहरा असलेल्या कोंकणपुत्र पश्चिम अंधेरीचे आमदार अमित साटम यांची निवड केली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी मुंबई महापालिका निवडणूक लढण्याचे रणनीतीसुद्धा आखली आहे. भाजपाचा इतिहास पाहिला तर भाजपामध्ये कार्यकर्ता व पुढारी निर्माणची प्रक्रिया निरंतर व सतत सुरू असते. नवीन नेतृत्वास वाव देण्यात येतो. त्यानुसारच आमदार अमित साटम यांची मुंबई शहर अध्यक्षपदी निवड करून त्यांच्या नेतृत्वास वाव देण्यात आला आहे. भविष्यात साटम राज्यस्तरावरील नेतृत्व करण्यास सक्षम ठरणार आहेत. निर्भीड असलेल्या आमदार अमित साटम यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक आव्हान जरी असले, तरी ते पेलण्यास समर्थ असल्याचे मुंबईमधील ज्येष्ठ जाणकारांचे मत आहे. ठाकरे बंधूंची युती, मराठी-अमराठीचा मुद्दा आणि महाआघाडीचे आव्हान समोर असल्याने अमित साटम यांनीसुद्धा स्वतःला निवडणुकीच्या तयारीत झोकून दिले आहे. वरळीत दि. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी संकल्प मेळाव्यात त्यांनी मुंबईमधील अटल सेतू ते कोस्टल रोड आणि मेट्रोपासून बी.डी.डी. चाळीसह अनेक विकासकामांची आठवण मुंबईकरांना करून दिली. तसेच हिंदुत्वाची प्रखर आक्रमक भूमिका घेऊन लँड जिहाद लव्ह जिहाद, व्होट जिहादच्या विदारक षडयंंत्राची भयानकता आक्रमकपणे मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन ही टॅगलाइन घेत मुंबईची सुरक्षा आणि विकासासाठी भाजपा मुंबई महापालिकेत येणार हा विश्वास कार्यकर्त्यांसमोर व्यक्त करून मुंबई विजयाचा संकल्प घेतला आहे. मुंबई अध्यक्ष आमदार साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत यश मिळेल, असे संकेत मुंबईकर जनतेकडून मिळत आहेत. भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी मुंबईच्या भौगोलिक रचनेनुसार 274 वॉर्डांमध्ये संघटनेची फेररचना करून कार्यकर्त्यांची सक्रियता वाढविणे व त्यांना सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा संघटना रचनाअंतर्गत संघटनेची बूथरचना, शक्तिकेंद्र आणि मंडळ रचना मजबूत तथा सक्रिय करीत आहेत. त्यासाठी ते स्वतःही प्रचंड प्रमाणात मेहनत घेत आहेत. मुंबईतील वॉर्डन् वॉर्ड व उच्चभ्रू ते झोपडपट्ट्या, सेवावस्त्या पिंजून काढत आहेत. ज्ञानविज्ञान, कला, चित्रपटसृष्टी, कामगारपासून उद्योजक, लघुउद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील नवनवीन लोकांना भाजपाचे उद्दिष्ट, ध्येयधोरणे समजावून सांगत आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने तथा उच्चशिक्षित असलेल्या अमित साटम यांनी नेहमी सामान्य माणसासोबत, सामान्य मुंबईकरासोबत नेहमीच संपर्क ठेवलेला आहे. भाजपा कार्यपद्धतीचा विचार केल्यास भाजपाचा कार्यकर्ता केवळ निवडणुकीपुरता काम करीत नसतो, तर तो आपापल्या कार्यक्षेत्रात सतत सक्रिय असतो. संघर्ष करीत असतो. काम करीत असतो. त्यामुळे भाजपाचा विजयी अश्व देशाच्या विविध भागांतील निवडणुकांमध्ये सतत विजयी ठरत आहे. मुंबईतही
ठरेल. मुंबईमधील मागील महिन्यातील काही घटनांचा मागोवा घेतल्यास त्यांनी मुंबईची सुरक्षा आणि विकासाच्या प्रमुख मुद्द्यांसोबतच हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेतली आहे. मालवणी पॅटर्न, अबू आझमी यांनी घेतलेल्या वंदे मातरम विरोधी भूमिकेला चोख प्रत्युत्तर, तसेच मंत्री मंगलप्रसाद लोढा- अस्लम शेख धमकी प्रकरणात घेतलेली कठोर व रोखठोक भूमिका मुंबईकरांसाठी किंवा मुंबई शहरातील सामान्य माणसाला दिलासा देणारी ठरली आहे. त्यामुळे आमदार साटम मुंबईकरांसाठी आश्वासक आणि निर्भीड चेहरा म्हणून समोर आले आहेत.
उच्चशिक्षित आणि प्रशासनामधील दांडगा अनुभव असलेल्या आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली होणार असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळवून देतील, असा विश्वास भाजपाचा सामान्य कार्यकर्ता व्यक्त करीत आहे. भाजपा कार्यकर्ता कोणाचा पराजय करण्यासाठी निवडणूक लढवत नाही, तर केवळ संघटनेला विजय मिळविण्यासाठी भाजपा कार्यकर्ता निवडणूक लढत असतो आणि निवडणूक झाल्यानंंतर हेवेदावे विसरून पुन्हा आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत होतो. हा उदात्त विचार घेऊन भाजपा मुंबई महापालिकेत उतरणार आहे. अमित साटम सामान्य मुंबईकरांचा निर्भीड, अभ्यासू आणि तडफदार चेहरा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळेल, असे मुंबईतील जाणकारांचे मत आहे.
Amit Satam in the fray in Mumbai's municipal elections