गोरगरीबांची मदत करीत ईद-उल-फित्रचा सण अमाप उत्साहात 

दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ईदगाहवर सामुदायिक नमाज

जुने नाशिक : वार्ताहर
मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्रचा सण शहर परिसरासह जिल्हाभरात अमाप उत्साहात साजरा झाला. ईदच्या सामुदायिक नमाजाचा मुख्य सोहळा गोल्फ क्लबवरील ऐतिहासिक शहाजहानी ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता शहरातील मुस्लिम बांधवांचे सर्वोच्च धर्मगुरू तथा खतीब-ए- शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी देशातील अखंडता व बंधुभाव कायम राहावा, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
देशातील मुस्लिम समाजाने हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देऊन देशवासीयांच्या हातात देशाची सूत्रे दिली होती. मुस्लिम समाजाने नेहमीच संविधानाचे रक्षण करून कायद्याचे पालन केले आहे.व यापुढेही कायद्याचे पालन करण्याचे आश्वासन ईदगाहच्या व्यासपीठावरून देण्यात आले. कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ईदगाह मैदानावर भर उन्हात झालेल्या सामुदायिक नमाज पठणात हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविला. यावेळी पोलीस आयुक्तालयातर्फे उभारण्यात आलेल्या स्वागत मंडपात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त रमेश पवार, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर दशरथ पाटील, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, ऋतुराज पांडे, अक्रम खतीब, शेखन खतीब, अतिक खतीब, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना काळे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, सुभान शेख, माजी सभापती वत्सला खैरे, राजेंद्र महाले, साबीर खतीब, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, हुसेन पठाण, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, विजय ढमाळ, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले आदीं मान्यवर उपस्थित होते.
परवा सायंकाळी ईदचे स्पष्ट चंद्र दर्शन घडले होते. यानंतर स्थानिक धर्मगुरू तथा खतीब-ए- शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी ईद साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करीत शहर परिसरातील शांतता कायम राहील यासाठी प्रयत्न करावे, देशातील जातीय सलोखा व अखंडता कायम रहावी यासाठी खास प्रार्थना करावी, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते. दरम्यान ईदगाह येथील सर्व आवश्यक सोयीसुविधांची कामे मनपाकडून पूर्ण करण्यात आली होती. याशिवाय इदगाहच्या मुख्य इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली, अशी माहिती शौकत सय्यद यांनी दिली. दरम्यान ईदनिमित्त येथील हसनैन फाउंडेशनतर्फे गरजू कुटुंबीयांना किमान एक लिटर दूधाचे मोफत वाटप करण्यात आले, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष शकील तांबोळी यांनी दिली आहे. ईदच्या पूर्वसंध्येस ईदच्या खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी उसळली होती. गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलिसांतर्फे ठिकठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले होते.

 

दूध बाजार परिसरातील हॉटेल्समध्ये खवय्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान ईदनिमित्त भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसआरपी जवानांची तैनाती करण्यात आली आहे. याशिवाय फिक्स पॉईंट उभारण्यात आले असून परिस्थितीवर सतत निगरानी केली जात होती, अशी माहिती भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी दिली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकरा मशिदीमध्ये देखील ईदचे नमाज पठण झाले. यावेळी सर्व मशिदीजवळ पोलिस बंदोबस्त तैनात होता, अशी माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *