हजारो भाविक दाखल : मुख्याधिकारी, तहसीलदार यांची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या दुसर्या सोमवारची जय्यत तयारी झाली असून, शिवभक्तांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी भाविक लक्षणीय संख्येने शहरात दाखल झाले होते. प्रशासन यंत्रणा सतर्क झाली असून, प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक चौकात पोलिसांसाठी मचाण बांधण्यात आले असून, शनिवारपासून सर्वत्र खडा पहारा लावण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासून खंबाळेत पार्किंग सुरू करण्यात आली आहे. बाहेरगावची वाहने शहराच्या बाहेर ठेवल्याने शहरात भक्तांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाल्याने मागील शनिवार व रविवारी उद्भवलेली अनागोंदी यावेळी अनुभवास आलेली नाही.
त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने दर्शनाचे योग्य नियोजन केले आहे. विश्वस्त कैलास घुले यांनी स्वत: दर्शनरांगेची पाहणी करून भक्तांसाठी सोयीसुविधांच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी अतितातडीचे 2500 रुपये देणगी दर्शन आणि 200 रुपये देणगी दर्शन या दोन्ही रांगा बंद राहतील. आलेल्या सर्व भाविकांना पूर्व दरवाजा मोफत दर्शनरांगेतून दर्शन मिळेल, असे नियोजन झाले आहे. त्र्यंबक नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या काही भागात भाविकांसाठी फॅब्रिकेटेड स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात पाऊस होत असतानादेखील स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
रविवारी दुपारी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी शहरात पाहणी करीत आवश्यक तेथे सूचना दिल्या आहेत. सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला गर्दी राहील, यासाठी रविवारी सकाळी तहसीलदार गणेश जाधव आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी भाविकांच्या सोबत अनवाणी पावलांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी त्यांनी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना काय अडचणी येतात, याचा स्वतः अनुभव घेतला असून, त्याप्रमाणे यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.
Elaborate preparations at Trimbak for the second Monday.