विशेष मुलाखत
– देवयानी सोनार
महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने यांचा निर्धार
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत एकता पॅनलच्या ऐतिहासिक विजयाने उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्र विभाग-1 च्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने यांनी ‘गांवकरी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गावागावांत उद्योजक घडविणे, उद्योगांसाठी पायाभूत सुविधा बळकट करणे, व्यापार्यांच्या प्रशासकीय अडचणी सोडविणे, महिला व युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठोस कृती आराखडा मांडला. व्यापारी व उद्योजकांचा विश्वास कृतीतून सार्थ ठरवण्याचा निर्धार व्यक्त करत पुढील दोन वर्षांत उत्तर महाराष्ट्राचा औद्योगिक चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रश्न : महाराष्ट्र चेंबरच्या निवडणुकीत विजयामागील मुख्य कारणे काय वाटतात?
उत्तर : हा विजय केवळ एका व्यक्तीचा किंवा पॅनलचा नसून, संपूर्ण व्यापारी आणि उद्योजकजगताने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. व्यापारी आणि उद्योजकांना चेंबरच्या कामकाजात बदल हवा होता, तो या निकालातून स्पष्ट झाला. विजयामागील मुख्य कारण म्हणजे आमचे एकता पॅनल तळागाळातील उद्योजक, व्यापार्यांपर्यंत पोहोचले. आम्ही केवळ आश्वासने दिली नाहीत, तर त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक रोडमॅप मांडला. टीमवर्क, पारदर्शकता आणि अचूक नियोजन ही या विजयाची मुख्य कारणे आहेत.
प्रश्न : उत्तर महाराष्ट्र विभाग-1 च्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना आपले प्राधान्यक्रम काय असतील?
उत्तर : अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या संकल्पनेतील गाव तिथे उद्योजक या अभियानाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राचा औद्योगिक विकास अधिक गतीने करणे हा माझा पहिला प्राधान्यक्रम असेल. यामध्ये प्रामुख्याने नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नवीन पायाभूत सुविधांचा विकास करणे. स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे. गावागावांमध्ये उद्योजक तयार करणे. प्रशासकीय पातळीवर प्रलंबित असणारे उद्योग आणि व्यापार्यांचे प्रश्न मार्गी लावणे.
प्रश्न : व्यापारी आणि उद्योजकांना आपण कोणत्या ठोस कामांद्वारे न्याय देणार?
उत्तर : विश्वास हा शब्दांनी नाही तर कृतीने सार्थ ठरवावा लागतो. यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात व्यापारी सहाय्यता केंद्र सुरू करणार आहोत. वीज, जमीन, पाणी आणि विविध परवानग्या मिळवताना येणार्या अडचणी थेट चेंबरच्या माध्यमातून सोडवल्या जातील. उद्योजकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक कालबद्ध यंत्रणा आम्ही उभी करत आहोत.
प्रश्न : उत्तर महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि लघुउद्योजकांसमोरील सध्या कोणती आव्हाने आहेत?
उत्तर : सध्या एमएसएमई आणि लघुउद्योजकांसमोर अनेक आव्हाने आहेत.कच्च्या मालाच्या दरातील प्रचंड चढ-उतार. कुशल मनुष्यबळाची मोठी टंचाई. बँकांकडून वेळेवर आणि सुलभ दरात कर्ज न मिळणे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना येणारा खर्च. या आव्हानांवर मात करण्यासाठी चेंबर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि क्लस्टर डेव्हलपमेंटवर भर देईल.
प्रश्न : महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपली भूमिका काय असेल?
उत्तर : महिला उद्योजक हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा आहेत. त्यांच्यासाठी चेंबरमध्ये स्वतंत्र महिला विंग अधिक सक्रिय केली जाईल. महिलांसाठी विशेष बिझनेस नेटवर्किंग सत्रे आयोजित करणे. शासकीय अनुदाने आणि योजनांची माहिती देणार्या कार्यशाळा घेणे. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष
प्रदर्शने भरवणे.
प्रश्न : चेंबरच्या कामकाजात कोणते बदल किंवा नवीन दिशा अपेक्षित आहेत?
उत्तर : पूर्ण बहुमतामुळे आता निर्णय प्रक्रियेला गती येईल. चेंबरचे कामकाज आता पूर्णपणे डिजिटल आणि कॉर्पोरेट धर्तीवर चालेल. लालफितीचा कारभार संपवून निर्णय गतिमान केले जातील. चेंबर आता केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न राहता, उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील छोट्या व्यापार्यांपर्यंत पोहोचेल.
प्रश्न : व्यापारीवर्गाच्या जीएसटी, करप्रणाली, परवानग्या किंवा प्रशासनाशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार?
उत्तर : करप्रणाली सुटसुटीत असणे हा व्यापार्यांचा हक्क आहे. जीएसटी आणि करप्रणालीतील जाचक अटींबाबत आम्ही थेट केंद्रीय आणि राज्य अर्थमंत्रालयाशी संपर्क साधून पाठपुरावा करणार आहोत. प्रशासकीय समन्वय समिती स्थापन करून शासकीय अधिकारी आणि व्यापारी यांची दरमहा बैठक घेतली जाईल, जेणेकरून परवानग्या मिळण्यातील अडथळे दूर होतील.
प्रश्न : युवा उद्योजक आणि स्टार्टअप क्षेत्राला चेंबरच्या माध्यमातून कशा प्रकारे जोडण्याचा विचार आहे?
उत्तर : तरुण पिढीकडे नवनवीन कल्पना आहेत. चेंबरच्या माध्यमातून आम्ही स्टार्टअप आणि इन्क्युबेशन सेंटर सुरू करत आहोत. यामध्ये तरुण उद्योजकांना अनुभवी मार्गदर्शक मिळवून दिले जातील. तसेच, स्टार्टअप्सना लागणारे भांडवल मिळवण्यासाठी व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि एंजेल इन्व्हेस्टर्स यांच्यासोबत विशेष बैठका घडवून
आणल्या जातील.
प्रश्न : आगामी दोन वर्षांत कोणती ठोस उद्दिष्टे आपण ठेवली आहेत?
उत्तर : पुढील दोन वर्षांचा आमचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे : उत्तर महाराष्ट्रात किमान 5 नवीन औद्योगिक क्लस्टर्स विकसित करणे. चेंबरच्या सदस्यसंख्येत दुप्पट वाढ करणे. प्रत्येक जिल्ह्यातील डिजिटल साक्षरता आणि ई-कॉमर्सचा विस्तार करणे.
‘Entrepreneur in Every Village’ campaign to be implemented in North Maharashtra.