नाशिक : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत येत्या 5 जून रोजी दैनिक गांवकरी व राधिका फाउंडेशन आणि आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने एक हजार बांबूच्या वृक्षांची लागवड नाशिक देवराई येथे करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणार्या पर्यावरणप्रेमींना दैनिक गांवकरी व राधिका फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातच सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी समन्वयक भास्कर पवार आणि बांबूतज्ज्ञ अजित टक्के यांचे सकाळी 10 ते 11 या वेळेत मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यामध्ये योग्य ठिकाणी योग्य प्रजातीच्या बांबूची लागवड व त्यापासून होणारे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन व उपजीविका याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन राधिका फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सेवक यांनी केले आहे. वन विभाग पश्चिम व आपलं पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई दर्शन कार्यक्रम सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत राहणार आहे.