साधुग्रामसह हजार एकरमध्ये जलवाहिन्यांचा विस्तार

अडीचशे कोटींचा खर्च; 24 तास पाण्याची व्यवस्था

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सिंहस्थ प्राधिकरण व महापालिका प्रशासनाला महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचे आव्हान असणार आहे. दरम्यान, मुकणे येथून थेट साधुग्राममध्ये गुरुत्ववाहिनीद्वारे जलवाहिनी आणली जाणार असून, लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. परंतु मुकणेचे पाणी साधुग्रामपर्यंत आणल्यानंतर तेथून ते आखाड्यातील साधू-महंतांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हजार एकरांत जलवाहिन्यांचा विस्तार केला जाणार आहे.
वृक्षतोडीमुळे महापालिकेची सध्या कोंडी झाली असून, त्यातच साधुग्रामसह उर्वरित हजार एकर परिसरात जलवाहिन्यांच्या विस्ताराच्या कामासाठी शेकडो झाडांंवर कुर्‍हाड चालवली जाण्याची शक्यता आहे. परिणामी पर्यावरणप्रेमी विरुद्ध महापालिका प्रशासन असा पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
या कामासाठी एक एकरसाठी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. असा हजार एकरसाठी अडीचशे कोटी खर्च अपेक्षित आहे. आगामी सिंह्स्थासाठी हजार एकर जागेचे अधिग्रहण करून साधू-महंतांची व्यवस्था केली जाणार आहे. या भागात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी महापालिका प्रशासन अडीचशे कोटी खर्चून जलवाहिन्यांचा विस्तार करणार आहे. साधुग्राममध्ये जलवाहिन्यांचा विस्तार करण्याचे नियोजन असले, तरी पर्यावरणप्रेमींचे साधुग्राममध्ये आंदोलन सुरू आहे. महापालिका साधुग्राममधील जागेचे संपादन करणार आहे. नांदूर परिसरातील आठशे एकर जमिनीचे अधिग्रहण करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, सिंहस्थ काळात या जागेवर विविध आखाड्यांतील साधू-महंत वास्तव्यास असतील. त्यांच्यासाठी रस्ते, स्वच्छतागृहांबरोबरच 24 तास पाणी पुरवण्याची जबाबदारी प्रशासनावर असेल. त्याद़ृष्टीने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. मात्र, नगररचना विभागाकडून अद्याप लेआउट मिळालेला नाही.
तांत्रिक कामे होताच पाणीपुरवठा विभाग डीपीआर तयार करेल. महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणाने तांत्रिकी मंजुरी देताच या कामाचे प्राकलन तयार केले जाईल.

20 लाख लिटरचे दोन जलकुंभ

हजार एकरांत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दोन ठिकाणी 20 लाख लिटरचे जलकुंभ उभारले जाणार आहेत. साधारणतः या कामासाठी पंधरा महिन्यांचा अवधी लागणार आहे.

दीडशे मिलिमीटर व्यासाची वाहिनी

संपूर्ण साधुग्रामसह नव्याने अधिग्रहीत केल्या जाणार्‍या परिसरात दीडशे मिलिमीटर व्यासाची वाहिनी टाकली जाणार आहे. नियोजनात बदल झाल्यास जलवाहिन्यांच्या व्यासाची क्षमता वाढवली जाऊ शकते.

तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साधारणत: वर्षभरात साधुग्राम परिसरातील हजार एकर जागेत जलवाहिन्यांचा विस्तार केला जाईल. याद्वारे 24 तास पाणीपुरवठा केला जाईल. नगररचना विभागाकडून लेआउट मिळताच प्रक्रियेला गती मिळेल.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, मनपा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *