गोदाकाठी अनुभवली नाशिकची समृद्ध परंपरा

गोदा संवाद वारसा फेरी उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी
काशी येथे झालेल्या ऐतिहासिक दंडक्रम पारायण विक्रमाच्या पार्श्वभूमीवर, नाशिककरांना आपल्या शहराच्या प्राचीन वैदिक वारशाची नव्याने ओळख करून देण्यासाठी इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीजतर्फे आयोजित ‘गोदा संवाद’ या उपक्रमाचे आठवे सत्र शनिवारी यशस्वीरीत्या झाले. वेदपठण परंपरा विशेष या संकल्पनेवर आधारित या निःशुल्क वारसा फेरीत उपस्थितांनी नाशिकची समृद्ध गुरू-शिष्य परंपरा आणि वेद्घोषाचा पवित्र अनुभव घेतला.
वेद हे भारतीय संस्कृतीची गंगोत्री असून, मौखिक परंपरेतून हजारो वर्षे जतन केलेले हे ज्ञानभांडार युनेस्कोने मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. गोदाकाठच्या अनेक वैदिक पाठशाळांमुळे या परंपरेत नाशिकचे स्थान अनन्यसाधारण आहे. याच वारशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि वेदांमागील शास्त्रीयता समजून घेण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष फेरीदरम्यान वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय या वेद स्मार्त चुडामणी शांताराम शास्त्री भानोसे यांच्या या पाठशाळेस भेट देण्यात आली. यावेळी पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर
यजुर्वेदातील मंत्रांचे प्रत्यक्ष सादरीकरण केले, ज्याने वातावरण मंत्रमुग्ध झाले. भारतीय विद्या अभ्यासक विनय जोशी आणि अनिता जोशी यांनी वेदांचे भारतीय संस्कृतीतील स्थान आणि महत्त्व उलगडून सांगितले. तसेच यावेळी वेदाचार्य रवींद्रशास्त्री पैठणे आणि वेदमूर्ती अभय भगरे यांनी मौखिक परंपरेतील संहिता पाठ, पदपाठ आणि विकृती पाठ यांविषयी सोदाहरण आणि सविस्तर माहिती दिली. या वारसा फेरीत एच.पी.टी. आर्ट्स महाविद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी वैदिक मंत्रांच्या स्वर उच्चारण पद्धतीमागील शास्त्रीयता अतिशय सोप्या भाषेत मांडली. याप्रसंगी इरा सेंटरचे प्रसाद गर्भे, अनिकेत गाढवे आणि डॉ. स्नेहल दंताळे
उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *