आमदारांची फोडाफोडी
भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. लोकशाहीची जननी म्हणून भारताची ओळख वेळोवेळी जगाला करवून दिली जाते. दुसरीकडे जगातील सर्वांत मोठा पक्ष भाजपाच असल्याचा दावा केला जातो. हे सर्व ठीक आहे. मात्र, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आमदारांना फोडण्याचा गंभीर आरोप भाजपावर केला जात आहे. निवडून आलेला/आलेले आमदार स्वखुशीने पक्ष सोडत नाहीत, तर त्यांना आमिष दाखवून पळवून नेले जात असल्याचे आरोपही केले जातात. छोट्याशा गोवा राज्यात काँग्रेसच्या ११ पैकी आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने तेथील गोवा सरकार मजबूत झाले आहे. वास्तविक पाहता गोव्यात भाजपाकडे बहुमत आहे आणि सरकारला कोणताही धोका नसतानाही काँग्रेसच्या आठ आमदारांना पक्षात प्रवेश देण्यात आला. विरोधी पक्षाला कमकुवत करण्यासाठी किंवा विरोधक शिल्लकच ठेवायचे नाहीत, असेच भाजपाचे धोरण असेल, तर लोकशाहीत विरोधी पक्षाला असलेले महत्व जगातील सर्वांत मोठ्या पक्षाला मान्य नाही, असाही आरोप केला जात आहे. येत्या काळात सर्वच पक्ष संपतील आणि भाजपा हाच एकमेव पक्ष राहील, असे या पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलेले आहेच. कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे आमदार फोडून भाजपाने सत्तांतर घडवून आणले. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाने तृणमूल कॉंग्रेसच्या अनेक आमदारांना आपल्या पक्षात सामावून घेतले होते. पण, निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. या पराभवानंतर काही महिन्यांनी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न होत असून, तो सोडून देण्यात आलेला नाही. राजस्थानमध्ये काँग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. झारखंडमध्येही असाच प्रयोग करण्याचा प्रयत्न होता. बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांनी वेळीच सावध होऊन आपले मुख्यमंत्रीपद वाचविले. दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्याचाही प्रयत्न भाजपाने केल्याचा आरोप आहेच. दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस’ अपयशी ठरल्यानंतर पंजाबमध्येही आपल्या पक्षाचे आमदार फोडण्याचा आरोप आम आदमी पक्षाने नुकताच केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे ४० आमदार फोडण्यामागे भाजपाच असल्याचे लपून राहिलेले नाही. फरक इतकाच की ४० आमदार भाजपात गेले नाही, तर त्यांनी आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केलेला आहे. शिवसेनेचे ४० आणि इतर १० आमदार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर ‘५० खोके बाकी सब ओके’ हा नवा वाक्प्रचार राजकारणात वापरात आला आहे. एका पक्षातून आमदार दुसर्या पक्षात का जातात? किंवा ते पक्ष का सोडतात? याचे कारण आता मतदारांना कळून चुकले आहे. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज राहिलेली नाही. गोव्यात आठ आमदारांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेची भाजपाला ‘काँग्रेस छोडो’ अशी खिल्लीही उडवता आली.
आप विरुध्द भाजपा
दिल्लीत आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर भाजपाने पंजाबमधील सत्तारूढ आपच्या आमदारांना गळाला लावण्याचा आरोप केला जात आहे. यावर आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी बोचरी टीका केली आहे. भाजपा जगातला सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा करतो. मात्र ही अपहरण करणारी सगळ्यांत मोठी गॅंग आहे. ‘ऑपरेशन लोटस’वरच त्यांचा पूर्ण फोकस असतो. लोकशाहीची आणि घटनेची हत्या करणे, हेच त्यांचे ऑपरेशन आहे. भाजपाकडून त्यांच्या निवडणूक चिन्हाच्या नावावर आमदारांच्या खरेदीचा व्यवसाय केला जातो, असे आरोप संजय सिंह यांनी केले आहेत. आपचे आमदार फोडण्यासाठी दिल्लीत ८०० कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते. मात्र, पंजाबमध्ये ते वाढवून १३७५ कोटी रूपये करण्यात आले असून, ५५ आमदार फोडण्याचे त्यांचे टार्गेट असल्याचा सनसनाटी आरोप पंजाबचे अर्थमंत्री आणि आपचे नेते हरपालसिंग चिमा यांनी केला. आता पंजाब सरकार पाडण्यासाठी आपच्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपाच्या कथित प्रयत्नांनंतर आपच्या पंजाबमधील सर्व आमदारांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल या मंडळींशी चर्चा करून त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे, आपने आक्रमक पवित्रा घेत थेट राज्याच्या पोलिस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली. आप आमदारांच्या शिष्टमंडळाने ही औपचारिक तक्रार करुन पुरावे सादर केल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या आरोपाला पुष्टी दिली आहे.आपने उचललेल्या पावलांनंतर पंजाबमधील राजकारण आणखीच तापण्याची चिन्हे आहेत. भाजपाने याआधीच आपचे आरोप खोटे आणि निराधार असल्याची प्रतिक्रिया दिली. आरोप मान्य होण्याची अपेक्षा नाहीच. मात्र, विविध राज्यांत अमक्या तमक्या पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात भाजपाचे नेते मागे नसतात, हे तितकेच सत्य. महाराष्ट्रात असेच दावे केले जात होते आणि अजूनही केले जात आहेत.
विरोधकांचेही प्रयत्न
आमदार फोडण्याचा आरोप केवळ भाजपावर केला जातो, अशातला काही भाग नाही. राजस्थानमध्ये काठावरचे बहुमत असलेल्या काँग्रेसने बहुजन समाज पार्टीच्या सहा आमदारांना पक्षात सामावून घेतले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक खेळी करुन बसपाच्या आमदारांना पक्षात विलीन करुन घेतले. त्यावर टीका झाली आणि बसपाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपाचे आमदार फोडण्याचा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य ओबीसी असून, त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर अखिलेश यादव यांनी दिली आहे. याचा साधा अर्थ, मौर्य यांनी आमदार घेऊन बाहेर पडावे असाच आहे. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना आमदारांची पळवापळवी अनेक राज्यांत झाली होती. त्यात आंध्र प्रदेश, हरयाणा या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपले सासरे एनटी रामाराव यांचा तेलगु देसम पक्षच हायजॅक केला होता. महाराष्ट्रात पुलोदची अधूनमधून चर्चा होत असते. त्या पुलोदचे शिल्पकार शरद पवार यांनीही आमदारांची फोडाफोडी केली होती. त्यावेळी पक्षांतरबंदी कायदा नव्हता. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला, तरी पक्षांतरे होत होतीच. हा कायदा आणखी कडक करुनही आमदार फोडण्याचे सत्र थांबलेले नाही. आमदारांची फोडाफोडी करण्याचे प्रयत्न पाहता कोणतेही राज्य सरकार अल्पमतात कधीही येऊ शकते, याचे ताजे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळाले. पक्षांतरबंदी कायदा असला, तरी भाजपाच नव्हे, तर इतर पक्षही आमदार फोडण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरुच ठेवतील. गोव्यातील घडामोडीवरुन तसेच दिसते.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…