कारागृह शिपाई, आरोपी व अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्मार्टफोन सुविधा कार्ड (अॅलन कार्ड) संदर्भात धक्कादायक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कारागृह शिपाई, शिक्षा भोगत असलेला कैदी आणि इतर अज्ञात आरोपींवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील दक्षता पथकाचे प्रदीप नाना हारगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डिसेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत कारागृह शिपाई वैभव नामदेव लांडगे व कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी दीपक रामभाऊ ढाकणे यांनी अज्ञात आरोपींशी संगनमत करून स्मार्टफोन सुविधा कार्ड (अॅलन कार्ड) मिळवण्यासाठी ठाणे अंमलदार, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व कराड पोलीस स्टेशन यांच्या नावाचे खोटे शिक्के व बनावट सह्या तयार केल्या.
खोटे पोलीस व्हेरिफिकेशन सादर करून दस्तऐवज खरे असल्याचे भासवून शासनाची व कारागृह प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली. पुणे येथील दक्षता पथकाचे प्रदीप हारगुडे यांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह भेटीदरम्यान आणि नंतर केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नाईकवाडे करीत आहेत.