सिडको : विशेष प्रतिनिधी :
गणेशनगर रस्त्याने पायी घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळाल्याची घटना 12 सप्टेंबर रोजी रात्री त्रिकोणी गार्डन परिसरात घडली.
संगीता योगेश मैड (वय 57, रा. फ्लॅट नं. 12, मयुरेश अपार्टमेंट, गणेशनगर, काठे गल्ली, नाशिक) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 12 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास संगीता मैड व त्यांची मैत्रीण चारुशीला चव्हाण या दोघी त्रिकोणी गार्डनमार्गे स्वामी समर्थ केंद्र, गणेशनगर रस्त्याने पायी घरी जात होत्या. त्याचदरम्यान अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील एक सडपातळ बांध्याचा, तोंडाला मास्क लावलेला मोपेडस्वार अचानक पाठीमागून आला व संगीता मैड यांच्या गळ्यातील पन्नास हजारांचे दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून त्रिकोणी गार्डनच्या दिशेने पळून गेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.