शेतकरी दाम्पत्याची शेतात आत्महत्या

हरसूल भागातील बेहडपाडा येथील घटना

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर

तालुक्यातील हरसूल भागातील बेहडपाडा येथील स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन पती-पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून, पोलीस आत्महत्येचे कारण शोधत आहेत. महादू किसन पवार (45 वर्षे) आणि रेखा महादू पवार (42, बेहडपाडा, ता. त्र्यंबकेश्वर) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बेहडपाडा शिवारातील मयत महादू पवार यांच्या शेतात असलेल्या ओहोळाच्या काठावर सोमवार, दि. 19 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांच्या नंतर महादू पवार हे जमिनीवर मृतावस्थेत आढळून आले होते तर पत्नी रेखा पवार या करंजीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. जमिनीवर मृतावस्थेत पडलेल्या महादू यांच्या मानेवर गळफासाचे व्रण आढळल्याने संशय व्यक्त होत होता. याबाबत हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मंगळवारी हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात पती-पत्नीच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळाच्या जवळ एका दगडावर ‘सॉरी अक्का’ असे शब्द आढळून आले आहे. पोलीस त्याचा तपास करत असून, ते कोणाला उद्देशून लिहिले आहेत तसेच दोन्ही पती-पत्नी यांनी आत्महत्या का केली, याचे कारण शोधत आहेत. दरम्यान, याबाबत अगोदर पतीने गळफास लावून घेतला व नंतर तेथे पत्नी पोहोचली व तिने पतीला झाडापासून खाली सोडवले, मात्र तो मयत झाला होता. त्या दु:खाने व्यथित होऊन पत्नीने मृत्यूला कवटाळले असावे, असा कयास बांधला जात आहे. मयत पवार पती-पत्नीच्या पश्चात बारावी झालेला मुलगा आहे. हरसूल पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे.

Farmer couple dies by suicide in their field

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *