बाह्य रिंगरोड भूसंपादनाविरोधात शेतकर्‍यांचे बेमुदत उपोषण

आ. रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या बाह्य रिंगरोड आणि एमआयडीसीसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकर्‍यांनी मंगळवारी (दि. 26) रामकुंड येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांनी भेट देत शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शविला.
आ. रोहित पवार यांनी, बाह्य रिंगरोड प्रकल्पाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. रिंगरोडमुळे सुमारे 25 गावे प्रभावित होत असताना स्थानिकांंना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला. विकास आराखड्यातील रस्त्यांना विरोध नसला, तरी काही प्रभावशाली बिल्डर्स आणि राजकीय नेत्यांच्या हितासाठी रिंगरोडचा मार्ग बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असल्याचे ते म्हणाले.
भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आलेल्या रेडीरेकनर दरांवरही त्यांनी आक्षेप घेत शेतकर्‍यांना बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्याची मागणी केली. शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी दबावाचे तंत्र वापरण्यात आले तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा इशाराही त्यांनी दिला.
आ. पवार यांनी नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीच्या कामकाजावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांत अनियमितता झाल्याचा दावा केला. 2 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती सार्वजनिक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनीही शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. महाविकास आघाडी शेतकर्‍यांच्या प्रश्नांंवर ठामपणे लढा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Farmers’ indefinite hunger strike against outer ring road land acquisition

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *