सिन्नरला भाजी मंडईत शेतकर्‍यांची लूट

लिलावापूर्वीच शेतमालाची चोरी; पैसे घेण्यासाठी व्यापार्‍यांकडून बळजबरी

सिन्नर : प्रतिनिधी
येथील चौदा चौक वाडा भाजी मार्केटमध्ये दररोज पहाटे व दुपारी होणार्‍या लिलावादरम्यान शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कोणी वालीच नसल्याचा प्रकार येथे निदर्शनास येत आहे.
तालुक्याच्या खेड्यांमधून शेतकरी दररोज दुचाकीवर क्रेट्स ठेवून शेतमालाच्या लिलावासाठी सिन्नर शहरातील चौदा चौक वाड्यात येतात. शेतकर्‍यांनी शेतमाल गाडीवरून खाली उतरवण्याच्या आधीच पाठीमागून आलेले काही व्यापारी परस्पर क्रेट्स काढून घेतात. शेतकर्‍यांना गाडी लावेपर्यंत क्रेट्स घेऊन ते पसार होतात. शेतकर्‍यांच्या शेतमालाची किंमतही व्यापारी स्वतःच ठरवून पैसे शेतकर्‍यांच्या खिशात बळजबरीने घालतात.
शेतकर्‍यांनी त्यास विरोध करताच बर्‍याचदा दमदाटी केली जाते. त्यामुळे बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दराने शेतकर्‍यांना शेतमाल विकावा लागत आहे. येथील भाजी बाजारात व्यापार्‍यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारावर नगरपालिकेचेही लक्ष नाही. पावती गोळा करण्यासाठी असलेला ठेकेदार केवळ क्रेट्सनुसार शेतकर्‍यांकडून पैसे घेतो. मात्र, शेतकर्‍यांना येथे सोयीसुविधा आणि संरक्षण नसल्याचा प्रकार वारंवार निदर्शनास येत आहे. या गोष्टींवर वचक ठेवण्यासाठी नगरपालिकेने तेथे कर्मचारी नेमावा, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

अडत सुरू केल्यास लूट थांबेल

चौदा चौक वाड्यात होणार्‍या लिलावात कुठल्याही प्रकारे अडत नसल्यामुळे खासगी व्यापारी शेतकर्‍यांचा शेतमाल कवडीमोलाने विकत घेतात. शेतकरी गाडीवरून शेतमाल उतरवण्याच्या आधीच क्रेट्स घेऊन खासगी व्यापारी पसार होतात. त्यामुळे नगरपालिकेने या ठिकाणी अडत सुरू करून शेतकर्‍यांची लूट थांबवावी.
– संतोष उगले, सामाजिक कार्यकर्ते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *