टँकरच्या धडकेत महिला शेतकरी ठार

नाशिक-अक्राळे फाटा रस्त्यावर भीषण अपघात

दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक-अक्राळे फाटा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असताना गुरुवारी सायंकाळी ढकांबे टोल नाक्याजवळ अपघात घडला. रस्त्यावर पाणी मारणार्‍या टँकरने दिलेल्या धडकेत महिला शेतकरी जागीच ठार झाल्या. या अपघातात कमल देवीदास बोडके (वय 55) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संबंधित ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असताना या कामावर पाणी मारत असताना टँकरच्या (एमएच 04 एफयू 9344) चाकाखाली ढकांबे येथील महिला कमल बोडके यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, ठेकेदाराकडून रस्त्यावर काम सुरू असतानाही आवश्यक सुरक्षा व उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही योग्य सूचनाफलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षितता व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी प्रशासन व ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुंडे तपास करीत आहेत. या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात अनेक रस्त्यांचे कामे सुरू असतानाही सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Female farmer killed in tanker collision

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *