सिडकोतील प्रकार; आपत्कालीन यंत्रणा अपयशी
सिडको : विशेष प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा धक्कादायक प्रकार काल समोर आला. अचानक वीज खंडित झाल्याने कार्यालयातील लिफ्टमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी तब्बल 15 ते 20 मिनिटे अडकून पडल्याची घटना घडली. या प्रसंगातून कार्यालयातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुट्टीचा दिवस असल्याने कार्यालयातील बहुतांश विभाग बंद होते. दरम्यान, स्वच्छतेचे काम सुरू असताना अचानक वीज गेली आणि संबंधित महिला लिफ्टमध्ये अडकली. वीज खंडित झाल्यानंतर लिफ्ट सुरू करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था, जसे की जनरेटर किंवा यूपीएस, कार्यान्वित नसल्याने ती महिला अंधारात अडकून मदतीसाठी आर्त हाक
देत होती.
सुदैवाने इतर कर्मचारी जवळ असल्याने हा प्रकार तातडीने लक्षात आला. अन्यथा सुट्टीच्या दिवशी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. विशेष म्हणजे, लिफ्टमध्ये बसवलेला आपत्कालीन फोनही निकामी ठरला. त्यामुळे महिलेला बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधता आला नाही.
महिलेला बाहेर काढण्यासाठी लिफ्टची चावी शोधताना कर्मचार्यांची मोठी धावपळ उडाली. चावी वेळेवर उपलब्ध न झाल्याने ती महिला जवळपास 15 ते 20 मिनिटे अडकून राहिली. अखेर विद्युत विभागाकडून चावी आणल्यानंतर लिफ्टचे दार उघडण्यात आले.
कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करणार्या महानगरपालिकेच्या कार्यालयात अशा मूलभूत सुरक्षा सुविधा नसणे ही गंभीर बाब मानली जात आहे. एकीकडे नाशिकला स्मार्ट सिटी बनवण्याचे उद्दिष्ट मांडले जात असताना, दुसरीकडे स्वतःच्या कार्यालयातील लिफ्टसारख्या यंत्रणांची योग्य देखभाल होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.
या प्रकारानंतर नागरिक आणि कर्मचार्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, मनपा आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Female sanitation worker gets stuck in municipal elevator