समान शत्रूशी साटेलोटे

भाजपाविरुद्ध एकत्रित येऊन देशभर लढायचे, राज्यात मात्र एकमेकांवर टीका करायची, अशी देशातील इंडिया आघाडी आहे. या आघाडीतील पक्ष आपल्या मित्रपक्षांवर भाजपाशी साटेलोटे असल्याचा आरोप करतात. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात चांगली जुंपली असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर भाजपाशी आतून मैत्री असल्याचा आरोप करत आहेत. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) म्हणजे डावी लोकशाही आघाडी सत्तेत असून, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) म्हणजे संयुक्त लोकशाही आघाडी विरोधात आहे. या राज्यात नगण्य स्थान असलेल्या भाजपाला काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महत्त्व देत आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर भाजपाशी साटेलोटे असल्याचा आरोप करत आहेत. याची सुरुवात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीच केली. मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि डाव्या लोकशाही आघाडीचे भाजपाशी साटेलोटे असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यातील शाब्दिक युद्ध टोकदार झाले आहे. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री विजयन यांनी गुरुवारी (दि. 26 मार्च) राहुल गांधींवर वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर जोरदार टीका केली. राहुल गांधी अनुभवातून काहीच शिकत नाहीत आणि काँग्रेस पक्ष हा प्रत्यक्षात भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे, अशी जोरदार टीका विजयन यांनी केली. देशभरातील विरोधी नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करत असताना, मुख्यमंत्री विजयन यांच्यावर मात्र कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई होत नाही. हा एलडीएफ आणि भाजपामधील गुप्त समझोत्याचा पुरावा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. एका पत्रकार परिषदेत विजयन यांनी या आरोपाचे खंडन केले. राहुल गांधी राष्ट्रीय नेते असले, तरी त्यांच्याकडे एका प्रादेशिक नेत्याइतकीही राजकीय समज नाही. ते वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि जुन्या चुकांतून बोधही घेत नाहीत, असे विजयन म्हणाले. काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याचा असा बौद्धिक र्‍हास होणे खेदजनक असल्याचे ते म्हणाले. विजयन यांनी विविध राज्यांतील उदाहरणे देत काँग्रेसवर निशाणा साधला. दिल्लीत आप नेत्यांच्या अटकेची मागणी करून काँग्रेसने भाजपाचा मार्ग सुकर केला, असा आरोप त्यांनी केला. हरियाणा आणि बिहारमध्ये भाजपाविरोधी भक्कम आघाडी उभारण्यात काँग्रेसला आलेले अपयशच भाजपाच्या विजयाला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी नमूद केले. केरळमध्ये कम्युनिस्टांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जनसंघापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत सर्वांशी हातमिळवणी
केल्याचा इतिहास आहे, असेही विजयन म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचा (यूडीएफ) पराभव निश्चित असल्याचे लक्षात आल्याने, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गुप्त समझोत्याचे खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत. ही केवळ आपल्या पराभवासाठी आधीच शोधलेली पळवाट असल्याचा टोला मुख्यमंत्री विजयन यांनी लगावला. काँग्रेस आणि भाजपाची मानसिकता एकच असून, देशात भाजपाला सत्तेत राखण्यासाठी काँग्रेसच अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा हा काँग्रेसचा राजकीय शत्रू आहे, तसा भाजपा हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही राजकीय शत्रू आहे. दोघांचा समान शत्रू एकच आहे. शत्रूशी साटेलोटे केल्याचा आरोप दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. दोन्ही पक्ष इंडिया आघाडीत आहेत. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, या राज्यात इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी भाजपाशी एकहाती सामना करत आहेत. केरळमध्ये परस्परविरोधी भूमिका घेणारे काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोन पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विरोधात आघाडी उघडली आहे. ममता बॅनर्जी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी जेवढी नफरत आहे तेवढीच नफरत काँग्रेसशी आहे. तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपा आतुर झाला आहे. काँग्रेस, मार्क्सवादी व इतर डावे पक्ष भाजपाला आतून मदत करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलेला नाही, पण तसा आरोप त्या मागेपुढे करू शकतात. तृणमूल काँग्रेस सरकारने पश्चिम बंगालला कर्जाच्या सापळ्यात ढकलले असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार रंजन भट्टाचार्य यांनी केला आहे. इंडिया आघाडीतील काही पक्ष प्रादेशिक राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे. केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीला सत्ता टिकवायची आहे, तर संयुक्त लोकशाही आघाडीला परत सत्वर येण्याची आस लागली आहे. या राज्यात एलडीएफ व यूडीएफ आलटूनपालटून सत्ता मिळवत असतात. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने डाव्यांची सत्ता खाली खेचल्याचा राग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आहे, तर काँग्रेसला केवळ अस्तित्वासाठी डाव्यांचा हात धरावा लागत आहे. काँग्रेस व डाव्यांचे खच्चीकरण तृणमूलने केले असले, तरी त्यांची जागा भाजपाने धेऊन ममता बॅनर्जी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. डावे, काँग्रेस, तृणमूल हे सारेच इंडिया आघाडीत भाजपाच्या विरोधात एकत्र असले, तरी त्यांची तोंडे एका दिशेला नाहीत. त्यांना प्रादेशिक राजकारणात रस अधिक आहे. केरळचा विचार करता काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकमेकांवर टीका करताना भाजपाशी साटेलोटे असल्याचा आरोप करून आपल्याच प्रमुख राजकीय शत्रूला म्हणजे भाजपाला महत्त्व देत आहेत. इंडिया आघाडीतील कोणत्याही पक्षाशी भाजपाचे सख्य नाही, हे विशेष. काँग्रेस आणि मार्क्सवादी यांचे भाजपाला वावडे आहेच. दोघांनाही भाजपाचे तितकेच वावडे. केरळ विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणे यासाठी दोन्ही बाजूकडून भाजपाचा साधन म्हणून वापर केला जात आहे. भाजपाला ते हवे आहेच. कारण भाजपाला या राज्यात अस्तित्व निर्माण करायचे आहे.

Fighting with the same enemy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *