तहसीलदार, पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा इशारा देणार्या व्हिडिओची दखल
लासलगाव : वार्ताहर
बुधवारी (दि. 28) दोन तासांत आत्महत्येचा इशारा देणार्या व्हिडिओची दखल घेत, धानोरे (ता. निफाड) येथील गट क्रमांक 124 मधील शेतजमिनीचा पंधरा वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर तहसीलदार व पोलिसांची तत्परता व समन्वयात्मक हस्तक्षेपामुळे शांततेत निकाली निघाला.
येथील दत्तात्रय संपत तासकर या युवकाने व्हिडिओद्वारे कैफियत मांडत प्रश्न तत्काळ निकाली न निघाल्यास दोन तासांत विहिरीत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. या व्हिडिओमध्ये माझ्या शेतजमिनीच्या बांध व वहिवाटी रस्त्यावरून गेल्या पंधरा वर्षांपासून वाद सुरू आहे. आम्ही चाळीस वर्षांपासून वापरत असलेला वहिवाटी रस्ता प्रतिवादी चुलत भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या दोन महिन्यांपासून बंद केला आहे. त्यामुळे माझी शेती पडीक
पडली आहे. मी यापूर्वी वारंवार पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असूनही प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. तसेच महसूल कार्यालयात अर्ज करूनही मला संबंधित अधिकार्यांची भेट मिळाली नाही. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही प्रतिवादी अडवणूक व धमक्या देत आहेत. मी मानसिक तणावात असून, मला न्याय न मिळाल्यास मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसपाटील गुजर यांनी तात्काळ हालचाली करत लासलगाव पोलीस ठाणे प्रभारी भास्करराव शिंदे यांना प्रकरणाची माहिती दिली. शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत हवालदार जाधव व आरोटे यांच्यासह तातडीने धानोरे येथे भेट देऊन दोन्ही बाजूंची वस्तुस्थिती जाणून घेतली. मात्र, हे प्रकरण महसुली स्वरूपाचे असल्याने सपोनि भास्करराव शिंदे यांनी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी समन्वय साधत मार्गदर्शन घेतले. तहसीलदार नाईकवाडे यांच्या सूचनेनुसार ग्राम महसूल अधिकारी शुभम पाटसकर, पोलिसपाटील अरुण गुजर, सागर गायकवाड, ग्रामस्थ, महसूल व पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत दोन्ही शेतकर्यांची सविस्तर बाजू ऐकून घेण्यात आली. प्रशासनाने तब्बल पाच तास वेळ देऊन कायदेशीर चौकटीत आणि शांततेच्या मार्गाने चर्चा करून शेतरस्त्याचा वाद निर्णयपूर्वक मिटवण्यात आला. पुढील कायदेशीर निर्णय येईपर्यंत या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचा वादी व प्रतिवादींना इशारा देण्यात आल्याने पीडित शेतकर्याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेली बाब लक्षात घेता महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने समन्वय साधून दोन्ही पक्षांची सविस्तर बाजू ऐकून घेतली. कायद्याच्या चौकटीत राहून, शांततेच्या मार्गाने शेतरस्त्याचा वाद तात्पुरता निकाली काढण्यात आला असून, पुढील कायदेशीर निर्णय होईपर्यंत कुणीही हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
– विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड