बडा उदासीन आखाड्यातून पाच साधू-महंत हद्दपार

त्र्यंबकेश्वर वास्तव्यास असलेल्या महंत रघुमुनींचा समावेश

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
श्री पंचायत बडा उदासीन आखाड्याने पाच साधू-महंतांना आखाड्यातून आजीवन हद्दपार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूतील कांचीपुरम येथे पार पडलेल्या श्री पंचायत आखाडा बडा उदासीन निर्वाणच्या बैठकीत या पाचही संतांचा हुक्का-पाणी बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला, अशी माहिती आखाड्याचे श्रीमहंत दुर्गादास महाराज यांनी दिली.
या बैठकीत आखाड्याच्या संघटनेशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने त्र्यंबकेश्वरचे श्रीमहंत रघुमुनी, स्थानिक महंत उग्रदास, जयेंद्र मुनी (कनखल), स्वामी शिवानंद (प्रयागराज) आणि सेवादास (हरिद्वार) यांनी आखाडा व श्री सतपंच परमेश्वर यांच्या प्रतिष्ठा आणि हिताच्या विरोधात न्यायालयासह इतर मंचांवर कृती केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आखाड्याची प्रतिष्ठा, शिस्त आणि परंपरांचे रक्षण करणे
सर्वपरी असून, भविष्यातही संस्थेच्या हिताविरुद्ध काम करणार्‍यांवर अशीच कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या दुसर्‍या गटाने नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे महंत रघुमुनी यांना बडा उदासीन आखाड्याचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून जाहीर केले होते. आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरी महाराज आणि महामंत्री श्रीमहंत हरीगिरी महाराज यांनी रघुमुनी यांच्याच सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळा होईल, असे व्यासपीठावरून सांगितले होते. मात्र, आता मूळ आखाड्यानेच महंत रघुमुनी यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे आखाडा परिषदेतील दोन्ही गटांमधील संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली
जात आहे.

Five sadhus and mahants banished from the Bada Udasin Akhada.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *