सराईत चोरटा जेरबंद
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड भागातील जुने बिटको हॉस्पिटल परिसरात एकाच रात्री पाच दुकाने फोडून एक लाख 12 हजार रुपयांची रोकड चोरणार्या सराईत चोरट्याला नाशिक गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने अटक केली आहे. आरोपीने तीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
जुने बिटको हॉस्पिटल परिसरात 14 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या पाच दुकानफोडी प्रकरणाचा छडा लावत नाशिक गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने धन्ना रामलाल राठोड (वय 40, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) याला अटक केली आहे. या चोरीत एकूण 1 लाख 12 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती.
चोरट्यांनी एका भांड्याच्या दुकानासह दोन मेडिकल, एका एजन्सीचे दुकान आणि एका मिठाई दुकानाचे शटर व कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरून नेली होती. या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात 15 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना नाशिकरोड युनिटच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तीन साथीदारांसह पाचही दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईनंतर परिसरातील व्यापार्यांनी पोलिसांचे कौतुक केले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.
Five shops broken into; goods worth ₹1.12 lakh stolen.