सिन्नरला बोगस बियाणे, खतांवर नियंत्रणासाठी भरारी पथके

सिन्नर : प्रतिनिधी
खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना वेळेत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊसमानाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने खरीप हंगामासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके तसेच तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
तालुक्यातील बियाणे, खते, कीटकनाशके व भाजीपाला रोपवाटिका परवानाधारकांसाठी 18 मे रोजी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कल्याण पाटील, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे व ज्ञानेश्वर दुरगुडे यांनी विक्रेत्यांना मार्गदर्शन केले.
हंगाम सुरू होण्यापूर्वी कृषी केंद्रांमधील बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, अप्रमाणित नमुन्यांवर विक्री बंदी आदेश लागू करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण पाटील यांनी दिली.
सिन्नर तालुक्यात सरासरी 60 हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी 3625 मे. टन युरिया, 3908 मे. टन एसएसपी, 246 मे. टन एमओपी, 2582 मे. टन डीएपी आणि 5174 मे. टन इतर कॉम्प्लेक्स खतांसह एकूण 15 हजार 535 मे. टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.
नंदकुमार अहिरे यांनी विक्रेत्यांना जादा दराने विक्री न करणे, लिंकिंग टाळणे, ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री करणे, शेतकर्‍यांना पक्के बिल देणे तसेच अनधिकृत फिरत्या वाहनांमधून निविष्ठांची विक्री टाळण्याच्या सूचना दिल्या. नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या वापराबाबत जनजागृती करण्याचेही आवाहन करण्यात आले.
भविष्यात खत विक्री शेतकरी आयडी (अ‍ॅग्रीस्टॅक) क्रमांकावर होणार असल्याने शेतकर्‍यांनी शेतकरी आयडी काढून घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. शेतकर्‍यांनी अधिकृत परवानाधारकांकडूनच कृषी निविष्ठा खरेदी करून पक्के बिल घ्यावे तसेच बियाण्याची मुदत, वाण व गुणवत्ता तपासूनच खरेदी करावी, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
भाजीपाला रोपवाटिकांसाठी शासनाने परवाना बंधनकारक केला असून, अधिकृत परवानाधारकांकडूनच रोपे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रोपांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढत असल्याने खरेदीची पावती जतन ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचे
निर्देश विक्रेत्यांना दिले. तसेच बोगस बियाणे, मुदतबाह्य निविष्ठा किंवा परराज्यातील कंपन्यांकडून होणारी अनधिकृत विक्री आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सिन्नर तालुका अ‍ॅग्रो डीलर्स संघटनेचे अध्यक्ष अनिल शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे, सचिव अंबादास वाघ आणि द्वारकानाथ कोकाटे यांनी उपस्थित विक्रेत्यांना कृषी विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

संपर्क अधिकारी म्हणून कृषी सहाय्यकांकडे जबाबदारी

रासायनिक खत वितरणात सुसूत्रता राहावी तसेच खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खतांची टंचाई, जादा दराने विक्री किंवा लिंकिंगच्या तक्रारी टाळण्यासाठी गावपातळीवर कृषी सहाय्यकांना संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Flying squads to Sinnar to control bogus seeds, fertilizers

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *