नाशिक

माजी मंत्री कोकाटे – खासदार वाजेंना सिन्नरकरांचा समसमान कौल

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा निष्प्रभ; भाजपाचा उमेदवार चौथ्या स्थानावर

सिन्नर : भरत घोटेकर
राज्यात महायुती सरकारमध्ये असूनही सिन्नरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजपा आणि शिंदेसेनेने नगरपरिषद निवडणुकीत वेगळी चूल मांडली. असे असतानाही माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विकासाला सिन्नरकरांनी साथ दिली. गेल्या वेळी केलेली चूक यावेळी सिन्नरकरांनी सुधारली. नगराध्यक्षपदाची सूत्रे कोकाटेंच्या ताब्यात देतानाच 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विजयी केले. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग करत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील उबाठालाही 14 जागांवर विजयी करत एकप्रकारे एकहाती सत्तेवर अंकुश घालण्याची तजवीज केली. दरम्यान, महायुतीचा घटक असलेल्या भाजपाचे दोन तर शिंदेसेनेचा एक नगरसेवक आता नेमका कुणाच्या गोटात बसणार की सवतासुभा मांडणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

कोकाटे – वाजेंना सिन्नर नगरपालिकेत कामकाज करण्याची समसमान संधी देताना भाजपाचे दोन तर शिंदेसेनेचा एक नगरसेवकही निवडून दिल्याने त्यांचा नगरपालिकेत चंचू प्रवेश झाला. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांमधील आश्वासनांना भीक न घालता सिन्नरकरांनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. पक्षाऐवजी व्यक्तीकेंद्रित राज्यकारणालाच सिन्नरमध्ये स्थान असल्याचे पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले.
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून विठ्ठलराजे उगले यांच्यासारखा संयमी आणि सर्वमान्य चेहरा नगराध्यक्षपदासाठी उतरवल्याने त्याचा मोठा फायदा झाला. परिणामी, 15 पैकी दोन ते तीन प्रभागांचा अपवाद सोडता इतर ठिकाणी त्यांचा प्रभाव दिसून आला. कोकाटे यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोपवल्यामुळे त्यांना सिन्नर शहराकडे लक्ष देण्यासाठी केवळ दोन ते तीन दिवस मिळाले. त्यांची कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनीच कार्यकर्त्यांच्या मदतीने शहरात तळ ठोकून घर न् घर पिंजून काढले. त्याची फलनिष्पत्ती ही चांगली मिळाली.
दुसरीकडे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांनी क्रमांक दोनची मते मिळवली असली, तरी ते विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र, शेवटच्या टप्प्यात ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, खासदार वाजे यांच्यासह पत्नी दीप्तीताई वाजे यांनी लक्ष घातल्यामुळे त्यांचे 14 नगरसेवक निवडून आले. परिणामी, प्रभाग 11 मधील दोन, प्रभाग 7 मधील दोन आणि प्रभाग 2 मधील एक अशा जागांवर तगडे उमेदवार असतानाही कोकाटेंच्या ताब्यातून या जागा हिसकावून घेण्यात त्यांना यश आले. तेथे नवख्या उमेदवारांना निवडून आणण्यात वाजे यशस्वी ठरले.
कोकाटेंना सोडचिठ्ठी देत ऐनवेळी शिंदेसेनेकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी केलेले नामदेव लोंढे यांना तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. मात्र, पक्षाला सर्व जागांवर उमेदवार देण्यात अपयश आल्याने त्याचाही फटका त्यांना बसला. शिवाय, शिंदेसेनेची शहरात ताकद नसल्यामुळे नामदेव लोंढे एकाकी पडले. त्यामुळे त्यांना समाजाधारीत मतांवरच अवलंबून राहावे लागले.
असे असले तरी त्यांनी भाजपाच्या उमेदवारापेक्षा अधिकची घेतलेली मतेही दुर्लक्षून चालणार नाही. इतर प्रभागात त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. स्वतःच्या प्रभागात पुतण्या शुभम लोंढे यांचा पराभव झाला. तर तेथे शोभा जाधव यांच्या रूपाने शिंदे गटाला एक जागा मिळाली.
भाजपाचे उदय सांगळे यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे यांच्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करूनही त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. शहरात भाजपाचा फारसा नसलेला प्रभाव, त्यातच खासदार वाजे यांच्यापासून दूर गेल्यामुळे वाजे गटातील कार्यकर्त्यांची त्यांच्यावर झालेली खपामर्जी त्यामुळे हेमंत वाजेंना विस्तारलेल्या उपनगरांमध्ये मते घेण्यात अपयश आले. असे असले तरी प्रभाग क्रमांक 10 मध्ये आशा कर्पे आणि अनिल सरवार यांच्या रूपाने दोन जागा निवडून आल्याने भाजपासाठी हा दिलासा ठरला.

सुज्ञ मतदारांकडून क्रॉस व्होटिंगच…

प्रभाग क्रमांक 1, 2, 4, 5, 6, 8, 12, 13 या आठ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले. विशेष म्हणजे, सुज्ञ मतदारांनी समजून-उमजून मतदान केल्यामुळे दिग्गज उमेदवारांना त्याचा फटका बसला. प्रभाग एकमध्ये तर अवघ्या एका मताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदना गोजरे पराभूत झाल्या. विशेष म्हणजे, या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उगले यांना मात्र जोरदार मते मिळाली.

Former Minister Kokate - Sinnarkar's equal vote for MP Vaje
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago