सिंहस्थापूर्वी काम मार्गी लावण्याचे आव्हान
नाशिक : प्रतिनिधी
चारशे कोटींच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर 31 जुलै रोजी कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. 20 ऑगस्टपर्यंत निविदेत सहभागी होण्याची संधी इच्छुक संस्थांना असताना, या दरम्यान चार कंपन्यांनी या कामासाठी तयारी दर्शवली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सदर योजनेचे काम मार्गी लावण्याची डेडलाइन संबंधित मक्तेदार कंपनीला असेल.
सदर प्रकल्पाचा एकूण खर्च भूसंपादन मिळून 395 कोटींपयर्र्ंत गेला आहे. राज्य शासनाने सिंहस्थकामासाठी मंजूर केलेल्या 2368 कोटींचा निधी मंजूर केला असून, मार्च 2026 पर्यंत मुकणे पाणीपुरवठा योजनेसाठी 125 कोटी खर्च करावे लागणार आहे. एक -दोन दिवसात या प्रकल्प कामासाठी कोणाची निवड होते, हे समजणार आहे. या योजनेतून विल्होळी येथे 274 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्र उभारून सिंहस्थासाठी विल्होळी ते साधुग्राममध्ये गुरुत्व जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. सदर पाणीपुरवठा योजनेमुळे सिंहस्थासह पंचवटी व द्वारका परिसरातील पाणीपुरवठ्याचा बराच ताण कमी होणार आहे. मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथे पंपिंग क्षमता वाढवून 2036 पर्यंतच्या लोकसंख्येला पाणी पुरवण्याचे नियोजन आहे. सिंहस्थावेळी शहरात एक कोटी भाविक येण्याचा अंदाज असल्याने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून 2036 पर्यंतच्या लोकसंख्येला पुरेल या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. शहराला दिवसाला 580 दशलक्ष घनफूट तर वर्षभरात 6200 दशलक्ष घनफूट पाणी लागते. यात गंगापूर धरणातून 4500 दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून 200 तर मुकणे धरणातून 1500 दशलक्ष
घनफूट पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. दोन वर्षांमध्ये कुंभमेळा होणार असून, पर्वणी काळात एक कोटी तर वर्षभरात पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. गंगापूर धरण हे गाळाने भरले असल्यामुळे येथून अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकत नाही. दारणा धरणामधून थेट जलवाहिनी नसल्यामुळे पाणी आणण्यात अडचण येते. या पार्श्वभूमीवर मुकणे पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करणे
महत्त्वाचे आहे.
या संस्थांचे अर्ज
♦ कोया अॅण्ड कंपनी कन्स्ट्रक्शन लि. एनसीसी लि.
♦ जेडब्ल्यूआयएल इन्फ्रा. लि.
♦ विष्णू प्रकाश आर पंगीला लि.
मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी चार संस्थांचे अर्ज आले आहेत. अटी-शर्थी पूर्ण करणार्या संस्थेला काम देण्यात येइल. या योजनेमुळे सिंहस्थातील भाविकांसह पंचवटीतील पाण्याचा प्रश्न मिटेल.
-रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, मनपा