चार टक्के नागरिक अद्यापही लसीकरणापासून वंचित

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात व देशात पुन्हा कोरोनाचे प्रकरण समोर येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, नाशिक शहरात अद्याप चार टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही. ज्या नागरिकांचा पहिला, दुसरा किंवा वय वर्षे 60 पुढील नागरिकांचा प्रिकॉशन डोस बाकी असेल अशा नागरिकांनी लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक मनपाच्या लसीकरण केंद्रावर 16 जानेवारी 2021 ला कोविड 19 लसीकरणाला सुरुवात झाली. नाशिक शहरातील वय वर्षे 18 वरील एकूण अपेक्षित लाभार्थ्यांपैकी 96 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. तर 77 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस देऊन लसीकरण पूर्ण झाले आहे. नाशिक शहरातील नाशिक महानगरपालिकेचे 4 रुग्णालये व 30 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र असून, प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे. तसेच शहरातील शाळा व महाविद्यालये या ठिकाणी जर विद्यार्थ्यांसाठी कोविड-19 लसीकरणाची मागणी केल्यास शाळा व महाविद्यलयात जाऊन त्या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. कोरोनाला थोपवायचे असेल तर लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवणे गरजेचे आहे. दरम्यान, अपेक्षित लाभार्थ्यापैकी 4 नाशिक शहरातील लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. अशा लाभार्थ्यांनी आपल्या घराजवळील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले असतील तर त्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे व ज्या नागरिकांचे कोव्हॅसिन लस घेऊन 28 दिवस पूर्ण झाले असतील तर त्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.
कॉर्बेव्हॅक्स लस घेऊन 28 दिवस पूर्ण झाले असतील तसेच फ्रंटलाइन वर्कर, हेल्थ केअर वर्कर व वय वर्षे 60 व त्यापुढील लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील तर अशा लाभार्थ्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपला बूस्टर डोस घेण्यात यावा. तसेच 18 ते 59 वयोगटातील लाभार्थ्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील तर लाभार्थ्यांनी खासगी कोविड 19 लसीकरण केंद्रावर शुल्क देऊन आपले बूस्टर डोसचे लसीकरण करून घ्यावे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार भविष्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत काही जिल्ह्यांमध्ये कोविड-19 रुग्णांची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पूर्ण लसीकरण करून घेणे हाच एकमेव पर्याय सद्यस्थितीत उपलब्ध आहे. नाशिक महानगरपालिकेतर्फे दि. 1 जून 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत हर घर दस्तक मोहीम-2 राबवली जात आहे. यामध्ये वैद्यकीय पथक आपल्या घरी येऊन कोविड-19 लसीकरण केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *