चार तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत

सागर वाघच्या प्रामाणिकपणाचे गोंदेगावकरांकडून कौतुक

लासलगाव : समीर पठाण
आजच्या काळात माणुसकी हळूहळू धूसर होत चालली आहे. मंदिरातील दानपेट्यांवरही लोभाची सावली पडल्याचे
दुःखद चित्र बघायला मिळत आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सद्भावना, नीतिमूल्यांचे वजन हलके होत असल्याचे चित्र समाजात ठिकठिकाणी दिसते. अशा काळोख्या वातावरणात एखाद्या व्यक्तीला सोन्याचे ब्रेसलेट सापडावे आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय ते मूळ मालकाला परत मिळावे; ही केवळ कृती नसून, समाजाला जागवणारी एक प्रकाशरेषा ठरते. अंधारमय होत चाललेल्या समाजात नीतिमूल्ये जपणारी सुवर्ण व्यक्तिमत्त्वे अस्तित्वात असल्याचा अनुभव गोंदेगावकरांनी नुकताच घेतला.
गोंदेगाव येथील अरुण निकम यांच्या मुलाचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नापूर्वीची वरमिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, नातेवाइकांची गर्दी असं एकंदर सगळीकडे आनंदाचं वातावरण भरून वाहत होतं. या मिरवणुकीदरम्यान वरपिता अरुण निकम हे गावातीलच सागर कचरू वाघ यांच्या मेन्स पार्लरमध्ये आले. यावेळी थोड्या गप्पा झाल्या. लग्नाचे आमंत्रण सागर याला देऊन अरुण निकम पुढे गेले. पण नकळत त्यांच्या हातातील चार तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट पार्लरमध्येच गळून पडले, ही बाब दोघांच्याही लक्षात आली नाही.
दरम्यान, सागर पार्लरचे काम उरकत होता. दुकानाला झाडू मारताना त्याच्या नजरेस एक चमक दिसली. जमिनीवर पडलेले सोन्याचे ब्रेसलेट होते. क्षणभर ते खरे सोन्याचे असल्याचे जाणवताच त्याने मित्र विजय सोमसेला दाखवले. सोन्याचे असल्याचे दोघांची खात्री झाली; पण आता मोठा प्रश्न होता हे ब्रेसलेट कोणाचे? मिरवणुकीत शेकडो लोक सहभागी झाले आहेत. पार्लरमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ राहिली. त्यामुळे ब्रेसलेट कोणाचे, याचा नेमका अंदाज येत नव्हता. कुणाला थेट विचारावे तर हे माझेच, असा दावा सांगण्याचा धोका होताच. म्हणून संयम ठेवत सागरने प्रामाणिकतेचा मार्ग निवडला. जोपर्यंत शोधकर्ता स्वतः येत नाही, तोपर्यंत कुणालाही ब्रेसलेटबद्दल सांगायचे नाही, असे त्याने ठरवले. पुढे गेलेल्या वरमिरवणुकीत पाहुण्यांची काहीतरी गडबड जाणवली. वरपित्याच्या हातातील ब्रेसलेट हरवल्याचे लक्षात येताच पाहुणे, नातेवाईक, गावकरी सर्वत्र शोधू लागले. निकम यांच्या चेहर्‍यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ही बाब सागरने हेरली. हे ब्रेसलेट कदाचित त्यांचंच असावे, असा अंदाज आल्याने सागर त्यांच्याजवळ गेला व चौकशी केली. खात्री होताच त्याने ब्रेसलेट निकम यांच्या हाती दिले. क्षणभर स्तब्ध झालेल्या निकम यांनी सागरला घट्ट मिठ्ठी मारली. उपस्थित पाहुण्यांनीही टाळ्यांच्या गजरात सागरच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले. या प्रामाणिकपणाबद्दल गोंदेगावकरांनी सागरचा नुकताच सत्कार केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *